JItendra Awhad On Akshay Shinde Encounter Sarkarnama
मुंबई

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नव्हे हत्या? आव्हाडांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

Jagdish Patil

Mumbai News, 29 Sep : बदलापूरमधील (Badlapur) लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मुंब्रा परिसरात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, अक्षयचा एन्काऊंटर करून सरकार या प्रकरणातील इतर आरोपींचा बचाव करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

या एन्काऊंटर प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे पुन्हा एकदा या एन्काऊंटर प्रकरणावर संशय व्यक्त केला जात आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत अक्षयची हत्या झाल्याचा दावा केला आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, "अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका, निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती."

पोलिसांच्या व्हॅनला पडदे

या ऑडिओ क्लिपमधील कथित प्रत्यक्षदर्शी अक्षयचा पोलिसांनी एन्काऊंटर केला त्यावेळी आपण त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा दावा केला आहे. तो फोनवर एका व्यक्तीशी बोलताना सांगतो की, "अक्षय शिंदे ज्या पोलिस व्हॅनमध्ये होता, त्या व्हॅनच्या मागेच त्याची गाडी होती. आम्ही प्रवास करत असताना मुंब्रा बायपासच्या वाय जंक्शनच्या आधी आम्ही पोहचलो. त्यावेळी आमच्या मागून आलेल्या पोलिसांच्या (Police) व्हॅनला पडदे लावण्यात आले होते, काही दिसत नव्हतं.

भीतीपोटी कुणालाही काही सांगितलं नाही

पोलिसांची व्हॅन पुढे त्यावेळी मोठा आवाज आला. मला वाटलं की गाडीच्या काही पाट्याचा आवाज आला असेल. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र काही वेळाने मी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर झाल्याची बातमी पाहिली. मात्र, मी भीतीपोटी कुणालाही याबाबत काही सांगितलं नाही, पण तुम्हाला या संदर्भातील माहिती द्यावी वाटल्याने मी या प्रकरणी तुम्हाला मेसेज केले पण नंतर ते डिलीट केला."

एकही सीसीटीव्ही नाही

दरम्यान, यावेळी ऐकणारा व्यक्ती त्या ठिकाणी सीसीटीव्ही वगैरे तर आहेत का? असं विचारतो त्यावर सांगणारा तिकडे डोंगराच्या बाजूला एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचं सांगतो. असं संभाषण आव्हाड यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमधील कथित प्रत्यक्षदर्शीचं असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. तर आता यावर पोलिस काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT