sujata saunik | eknath shinde | ajit pawar | devendra fadnavis sarkarnama
मुंबई

Sujata Saunik : "लाडक्या बहीणींसाठी इव्हेंट, सक्षम भगिनीला त्रास", सुजाता सौनिक यांच्यावर राजीनाम्यासाठी शिंदे सरकारकडून दबाव?

Akshay Sabale

राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना राजीनाम्यासाठी शिंदे सरकारकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते, अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच, सुजाता सौनिक Sujata Saunik यांच्या पतीवर ( मनोज सौनिक ) खोटी कारवाई करून अडकवण्याचा प्रयत्न सरकारकडून येत आहे, असा दावाही दानवे यांनी केला आहे. याबद्दल दानवे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र लिहिलं आहे.

"एकीकडे 'लाडकी बहीण' म्हणून राज्यात रोज इव्हेंट करायचे. दुसरीकडे सक्षम भगिनीला त्रास देण्यासाठी षडयंत्र रचायचे, असा कारभार सुरू आहे," अशी टीका दानवे यांनी शिंदे सरकारवर केली आहे. दानवे यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अथवा शिंदे सरकारमधील मंत्री काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचं आहे.

अंबादास दानवेंनी काय म्हटलं?

अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना लिहिलेल्या पत्रासह 'एक्स' अकाउंटवर ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये दानवेंनी लिहिलं, "मुख्य सचिव सुजाता सौनिक या शिस्तीच्या अधिकारी. सरकारच्या 'कट प्रॅक्टिस' ला थारा न देणाऱ्या सौ. सौनिक यांच्यावर सरकारतर्फे आता राजीनाम्यासाठी दबाव टाकला जात आहे. तसे न केल्यास त्यांच्या पतीवर या न त्या वाटे(गावकर) खोटी कारवाई करण्याची तयारी सरकार करते आहे. महाराष्ट्रात आपली कारकीर्द गाजवणाऱ्या भाप्रसे अधिकारी व्ही. राधा आणि आय. ए. कुंदन यांनाही अगदी अडगळीत ठेवले आहे."

"एकीकडे 'लाडकी बहीण' म्हणून राज्यात रोज इव्हेंट करायचे आणि दुसरीकडे सक्षम भगिनीला त्रास देणायसाठी षडयंत्र रचायचे, असा कारभार सुरू आहे. असेच सुरू राहिले तर तत्त्वानं काम करणारे अधिकारी महाराष्ट्रात राहतील का?" असा सवाल अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारला विचारला आहे.

राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात दानवे काय म्हणाले?

प्रति, मा.श्री. सी.पी. राधाकृष्णन, महामहीम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य

विषयः राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत.

आदरणीय महोदय,

राज्याच्या प्रशासकीय क्षेत्रातील अतिशय महत्वाच्या असलेल्या मुख्य सचिव या पदी राज्य शासनाने श्रीमती सुजाता सौनिक यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना आहे. भारतीय प्रशासकीय सेवतील (IAS) सन 1987 बॅचच्या अधिकारी असून, त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांच्या विविध महत्त्वाच्या पदांवरील कार्यानंतर सन 2024 मध्ये त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

तथापि, गत काही महिन्यांपासून राज्य सरकार श्रीमती सुजाता सौनिक यांना विविध कारणांनी राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहे. त्यांनी शासनाच्या निर्णयांना विरोध केल्यामुळे त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात येत आहे. याशिवाय, राजीनामा दिल्यास त्यांचे पती व राज्याचे माजी मुख्य सचिव श्री. मनोज सौनिक यांना महत्त्वाच्या पदी नियुक्ती देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात आला असून सदरहू प्रस्ताव नाकारल्यास त्यांना कायदेशीर बाबींमध्ये अडकवण्यात येणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

कुंदन यांच्या सारख्या अनेक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांना अति महत्त्वाच्या विभागातून बदली करून त्यांना कमी महत्त्वाच्या विभागामध्ये पाठविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील विविध विभागामध्ये कार्यरत असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यामध्ये राज्य सरकार प्रती असंतोषाची भावना निर्माण झाली असल्याची बाब माझ्या निदर्शनास आली आहे. सदरहू बाब गंभीर स्वरुपाची आहे. तरी उक्त प्रकरणी आपण तात्काळ चौकशी करुन प्रशासनाच्या कामात होत असलेला राजकीय हस्तक्षेप टाळून महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय प्रणाली पारदर्शक आणि तटस्थ ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत राज्य सरकारला निर्देश द्यावेत, ही विनंती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT