Union Home Minister Amit Shah during the BJP office inauguration event in Mumbai, where his statement on wiping out opposition sparked sharp reactions from Sanjay Raut. Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : 'पक्षासाठी खस्ता खाल्लेले मुंबईतील कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी गैरहजर, व्यासपीठावर सर्व उपरे; मूळ भाजपवाल्यांना त्यांच्या सतरंज्या उचलण्याचे काम...'

Sanjay Raut On BJP Internal Rift : 'गृहमंत्री अमित शहा भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी मुंबईत आले. ते काहीतरी शुभ बोलतील असे वाटले होते, पण “विरोधकांना संपवा. विरोधक दुर्बिणीतूनही दिसणार नाहीत असे करा,” असे अभद्र बोलून ते निघून गेले. कोणत्या विरोधकांना अमित शहा पूर्णपणे संपवायला निघाले आहेत?'

Jagdish Patil

Mumbai News, 02 Nov : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतंच भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी मुंबईत आले होते. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी भाजप हा कुणाच्या कुबड्या घेऊन चालणारा पक्ष नाही, स्वबळावर चालतो असं वक्तव्य केलं.

शिवाय याचवेळी त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांचा सुपडासाफ झाला पाहिजे, दुर्बिण लावूनही विरोधक सापडता कामा नये, असंही म्हटलं होतं. अमित शहांच्या याच वक्तव्यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्राच्या रोखठोक या सदरातून शहांवर जोरदार टीका केली आहे.

'गृहमंत्री अमित शहा भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी मुंबईत आले. ते काहीतरी शुभ बोलतील असे वाटले होते, पण “विरोधकांना संपवा. विरोधक दुर्बिणीतूनही दिसणार नाहीत असे करा,” असे अभद्र बोलून ते निघून गेले. कोणत्या विरोधकांना अमित शहा पूर्णपणे संपवायला निघाले आहेत? भाजप हा सध्या दोन खांबी तंबू आहे.

दोन्ही खांबांना भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. एक खांब कलंडला तरी संपूर्ण भाजप पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून पडेल, असा हल्लाबोल राऊतांनी केला. तसंच यावेळी त्यांनी या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नव्हते यावरूनही भाजपवर निशाणा साधला.

राऊतांनी लिहिलं की, 'भाजप कार्यालयाची कुदळ मारताना भाजपचे सर्व 'सावजी चिकन' म्हणजे बाहेरून आलेले लोक व्यासपीठावर होते, पण ज्यांनी महाराष्ट्रातील भाजपसाठी खस्ता खाल्ल्या ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या महत्त्वाच्या सोहळ्यात कोठेच दिसले नाहीत. राण्यांपासून नार्वेकरांपर्यंत, राम शिंद्यांपासून विखे पाटलांपर्यंत सगळ्या उपऱ्यांची मांदियाळी तेथे होती. हे सर्व काँग्रेस, शिवसेनेतून गेलेले लोक.

त्यांच्या सतरंज्या उचलण्याचे काम आता मूळ भाजपवाल्यांना करावे लागेल. गडकरी व्यासपीठावर नव्हते हा भाजपचा अंतर्गत कलह आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत भाजपच्या आशीष शेलार यांना स्थान मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'वरून सूत्रे हलवली जात आहेत. 'भाजप विरुद्ध भाजप' हे जागोजागचे चित्र आहे. त्यामुळे शहा हे कोणत्या दुर्बिणीतून विरोधकांचे अस्तित्व संपवणार आहेत? असा राऊतांनी केला.

तर शहांनी दुर्बिणीतून पाहिले तर त्यांना कळेल की महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत व पोलिसांच्या दंडुकेशाहीला ते घाबरत नाहीत. राज्यात सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. मुख्यमंत्री त्यावर काय करतात? मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या मागण्यांसाठी हजारो लोकांसह मुंबईत आले. आझाद मैदानावर त्यांनी तंबू ठोकला. पाच दिवस आंदोलकांनी मुंबई विस्कळीत केली.

मराठी माणूस मुंबईत एकवटला तर काय घडेल याचे प्रात्यक्षिक जरांगे पाटलांनी दाखवले. या आंदोलनास सामोरे जाण्याची हिंमत मुख्यमंत्री फडणवीसांनी शेवटपर्यंत दाखवली नाही. अमित शहांनी त्यांच्या दुर्बिणीतून हा शौर्य प्रसंग अनुभवायला हवा होता. बच्चू कडू हे हजारो शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरले व फडणवीसांच्या नागपुरात घुसून त्यांनी सगळ्यांचीच दाणादाण उडवली.

'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, कर्जमाफी करा' अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांच्या वतीने बावनकुळे व महाजन हे दोन मंत्री कडूंशी चर्चा करीत राहिले. कडू यांनी रक्तपाताची भाषा केली तेव्हा भाजप मंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली. शहांनी हे सर्व दुर्बिणीतून टिपलेच असेल, असा टोलाही राऊतांनी सामनामधून लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT