Amruta Fadnavis-Nawab Malik
Amruta Fadnavis-Nawab Malik Sarkarnama
मुंबई

तुम्ही मर्द आहात, तर थेट देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करा : अमृतावहिनी कडाडल्या!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी आज सकाळी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याला ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याने अर्थपुरवठा केल्याचा आरोप केला होता. त्याला अमृता यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन जोरदार उत्तर दिले. नवाब मलिक यांचा उल्लेख बिगडे नवाब, असा करत ‘बेनकाब नवाबही होता है, और वो जरुर हो जायेगा. तसेच, तुम्ही मर्द आहात, तर थेट देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करा, असे आव्हानही त्यांनी अल्पसंख्याक मंत्री मलिक यांना दिले. (Amrita Fadnavis's answer to Nawab Malik's allegations)

अमृता फडणवीस म्हणाल्या की, मी राजकारणी नसून सामाजिक कार्यकर्ती आहे, त्याचदृष्टीने मी नबाव मलिकांच्या आरोपाला उत्तर देईन. मुंबईत आल्यानंतर लोकचळवळ चालविणाऱ्या संस्थांनी संपर्क साधला. त्यात ‘रिव्हर मार्च’ ही संस्थाही होती. मुंबईतील चार नद्यांबाबत जनजागृती ते करत होते. त्या संस्थेच्या प्रतिनिधीसोबत या नद्यांची प्रथम मी माहिती घेतली. नद्यांची ती अवस्था पाहून माझे मन हेलावून गेले. त्यानंतर मी त्यांच्याशी काम करण्याचा निर्णय घेतला.

नद्यांच्या दुरवस्थेबाबत मुंबईच्या आयुक्तांना माहिती द्यावी लागेल याची जाणीव झाली. चितळे कमिटीने या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याची शिफारस केली होती. पण मुंबई महापालिकेने अजूनही त्यादृष्टीने काम केलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी मागे लागून नद्यांचे शुद्धीकरण करण्याची मागणी केली. मुंबई पालिकेचे तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांचे मात्र त्यावेळी सहकार्य मिळाले. त्यानंतर ईशा फाउंडेशनचे गुरु जग्गी वासुदेव यांच्या रॅली फॉर रिव्हर यांच्याशी संपर्क आला. त्यांच्या कार्यक्रमाला मी स्वतः हजेरी लावली. ‘रिव्हर मार्च’ने सचिन गुप्ता आणि जयदीप राणा हे डायरेक्टर आणि त्यांचा अस्टिटंट यांना आपल्या गाण्यासाठी आऊटसोर्स केले होते. या दोघांनीही जग्गी वासुदेव यांच्यासाठी ‘ओ नदी ओ नदी’ हे गाणे तयार केले. मी, देवेंद्र फडणवीस आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकरांनी ते गाणं गायलं होतं, अस फडणवीस म्हणाल्या.

त्यांनी सांगितले की, ‘रिव्हर मार्च’ वाल्यांचं काम आम्हाला आवडलं. त्यांनी आमच्यासाठी एक गाणं तयार करा, मुंबईसाठी आम्हाला एक विशेष गाणं बनवायचे आहे, असे सांगितले. त्यावेळी सचिन गुप्ता यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिला. गुप्ता यांनी दिग्दर्शनासाठी मदत केली आणि ‘रिव्हर मार्च’वाल्यांनी मुंबईसाठी काम करायचं; म्हणून मोफत या गाण्याचं शुटींग केले. एकीकडे अनेक लोकांनी आपला वेळ आणि पैसे खर्च करून हे गाणं बनवलं आहे. त्या गाण्यात कोळी समाज, मुंबईचे डब्बेवाले यांना घेतले होते. त्या सर्वांनी हसतमुखाने सहभाग घेतला.

मुंबईच्या प्रेमापोटी जे सामाजिक कार्यकर्ते काम करीत आहेत, त्यांनाच आज लाथ मारली जात आहे. मला आणि ‘रिव्हर मार्च’ वाल्यांना कोणतीही राजकीय महत्वकांक्षा नाही, अशा लोकांच्या पाठीमागे तुम्ही लागता. हे कोणते राजकारण आहे. तुम्हाला राजकारण करायचे, तुम्हाला बिगडे नवाब व्हायचे आहे. बिगडे नवाबची ताकद आहे, ती सुधरे नवाबमध्ये रुपांतरित करा, तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो नाहीतर आपले काही खरं नाही. हे सवाल बिगडे नवाबला किंवा त्यांच्या बॉसला किंवा तुमच्या सुपर बॉसला विचारावे लागतील, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

रॅली फॉर रिव्हर ग्रुपला मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन आले होते. ईशा फाउंडेशनचे गुरु जग्गी वासुदेव एखाद्या निर्मात्याला घेतात आणि त्यांचे चांगले काम केले आहे, तर आम्ही त्यांना ओके म्हणतो. तेव्हांचा त्यांचा रेकार्ड हा पंटरचा नव्हता. तुम्ही लक्षात घ्या की आम्ही एका कारणासाठी पुढे जात आहेत आणि आम्हाला कसे मागे ओढले जात आहे. माझ्यावर आणि माझ्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप करत आहेत. त्यांनी लक्षात घ्यावे की माझी स्वतंत्र ओळख आहे. पण, माझ्या अंगावर कोणी आले तर मी कोणलाही सोडणार नाही.

या गाण्याशी संबंध असलेल्या व्यक्तीवर ड्रग्जप्रकरणात आरोप झाल्यानंतर त्यांचे नाव तेथून काढून टाकण्यात आले आहे. त्याबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या की, त्यांना याबाबत पूर्वी माहित नसेल की तो ड्रग्ज प्रकरणात आहे म्हणून. एनसीबीने तीन ते चार वर्षांनी त्याला पकडे असेल आणि ‘रिव्हर मार्च’ वाल्यांना वाटले असेल की तो निगेटिव्ह व्यक्ती आहे आणि तो या चळवळशी संबंधित नसावा, असे त्यांना वाटेल असेल त्यामुळे त्यांनी ते नाव काढले असेल, असा खुलासाही राणा याचे नाव काढून टाकण्याबाबत केला.

महिलांना राज्याच्या राजकारणात ओढले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच मी म्हटले होते की ज्या महिला सरळ मार्गाने चालतात, त्यांना डिवचू नका. तेच आज माझ्याबरोबर झाले आहे. तुम्ही मर्द आहात, तर थेट देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. मी यापुढेही सामाजिक काम मी करतच राहणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT