Anand Paranjape, Shrikant Shinde
Anand Paranjape, Shrikant Shinde sarkarnama
मुंबई

श्रीकांत शिंदेच्या आरोपांना आनंद परांजपेंचे प्रत्युत्तर; राष्ट्रवादीही मैदानात

Amol Jaybhaye

ठाणे : शिवसेना (Shivsena) हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्ष असून कसा चालवायचा हे त्यांना माहित आहे. ते सक्षमही आहेत. त्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. मात्र, आमच्या आदरणीय नेत्यांवर टीका केली तर ती खपवून घेतली जाणार नाही. पवारसाहेबांवर टीका करणार्‍या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपली लायकी तपासावी नंतरच टीका करावी, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक तथा शहराध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी केला.

एकनाथ शिंदे समर्थकांनी आज शक्तिप्रदर्शन केले. यावेळी श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. त्या टीकेवर आनंद परांजपे यांनी आक्रमक होऊन प्रत्युत्तर दिले. खरंतर खासदार शिंदे हे अपरिपक्व आहेत, हे आपणाला माहित होते. मात्र, त्यांना ठाणे जिल्ह्यातील राजकारणाविषयी पूर्ण माहिती नाही, हेदेखील आता त्यांच्या विधानातून स्पष्ट झाले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या कुठल्याही कमिटीची पूर्तता केली नाही. सातत्याने राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचे काम हे पालकमंत्री शिंदे यांनी केले, असल्याचा आरोप परांजपे यांनी केला.

फुटेल त्यासोबत जाण्याची मस्के यांची सवय

नरेश म्हस्के म्हणाले, की राष्ट्रवादीचे नगरसेवक त्रास द्यायचे. पण, प्रत्येक महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना न बोलू देणे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांना न बोलू देणे, विकास कामांमध्ये राजकारण करणे, किंबहुना कोरोनाकाळात लसीकरणातही राजकारण करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना लस कमी देणे, अशा प्रकारचे घाणेरडे राजकारणही म्हस्के यांनी केले. यावेळी परांजपे यांनी नारायण राणे हे जेव्हा फुटले तेव्हाची आठवण करून दिली. हेच म्हस्के राणे फुटले तेव्हा त्यांच्या सोबत गेले होते. कायमची त्यांची सवय आहे की जे फुटतात त्यांच्याबरोबर जातात आणि नंतर परत पक्षात येतात.

गुवाहाटीला जाण्यामागे गौड'बंगाल' काय? 

महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्येही भाजपची सत्ता आहे. पण, एकनाथ शिंदे हे गुवाहाटीलाच का गेले? या मागेही एक कारण आहे. गुवाहाटी जवळच कामाख्या देवीचे मंदिर आहे. हे मंदिर तंत्र-मंत्र याच्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ते गुवाहाटीला गेले आहेत. हे आता त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनाही समजले आहे, असे सांगून परांजपे यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT