Andheri Election Sarkarnama
मुंबई

Andheri Election : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीला वर्ष पूर्ण, आता मतदारराजा कोणाला देणार कौल?

Maharashtra Politics : ...त्या भीतीपोटीच दीड वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास टाळाटाळ?

Sachin Waghmare

Andheri News : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागून एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर २०२२ पर्यंत राज्यातील वातावरण पूर्णपणे महविकास आघाडीच्या बाजूने होते. त्यामुळेच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात त्यावेळी भाजप, शिंदे गटाने उमेदवार दिला नव्हता, कारण त्यावेळेस ठाकरे गटाला प्रचंड सहानुभूती होती, अशी चर्चा होती.

शिवाय, विरोधी पक्षाने उमेदवार दिला असता तर निवडून आला नसता अशी तेव्हा परिस्थिती होती. एवढेच नव्हे तर त्या भीतीपोटीच गेल्या दीड वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे आता बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा गदरोळ माजला होता. भाजपकडून मुरजी पटेल यांनी, तर शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, माघारीच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला आपला उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर भाजपने पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.

त्याच ठिकाणी लटके यांचा विजय निश्चित झाला होता. शिंदे गटाने त्यावेळेस राजीनाम्याच्या कारणावरून ऋतुजा लटके यांना वेठीस धरून शिंदे गटाकडून निवडणूक लढविण्याचा आग्रह केला होता. मात्र त्यांना त्यामध्ये यश आले नव्हते. त्यामुळे ठाकरे गटाच्या लटके यांनी एकतर्फी विजय मिळवला.

गेल्या दोन वर्षाच्या काळात भाजपने महाविकास आघाडीला दोन धक्के दिले. पहिल्यांदा जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथ शिंदेसह 40 आमदारांचा गट महायुतीमध्ये आणला. तर दुसऱ्यावेळी जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार यांच्यासह 40 आमदारांचा गट महायुतीमध्ये आला. त्यामुळे राज्यातील चित्र आता मात्र पूर्णपणे बदलले आहे. या वर्षभराच्या कालावधीत बरेचसे पाणी पुलाखालून गेले आहे.

त्यामुळे वर्षभरापूर्वी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी जेवढी सहानभूती होती, तेवढी सहानभूती नसेल असे सत्ताधारी पक्षांना वाटत आहे. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना फोडूनही काही परिणाम होत नसल्याने, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना फोडून उपमुख्यमंत्रीपद दिले. त्यामुळे जवळपास 190 च्या आसपास आमदारांचा सध्या राज्यातील सरकारला पाठिंबा आहे.

मात्र गेल्या काही दिवसांत जे सर्व्हे समोर आले आहेत, त्यामध्ये ठाकरे गट व शरद पवार गटाविषयी सहानभूती कायम असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून इच्छा असूनही महायुती सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल केली जात असल्याचे बोलले जात आहे.

कधी होणार निवडणुका ? -

महायुतीच्या रणनीतीनुसार येत्या काळात एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूक पार पडेल. त्यामध्ये मोदी सरकारबद्दल असलेल्या सहानुभूतीच्या जॊरावर मिशन-45 राबवले तर 25 पर्यंत जागा मिळतील असा कयास आहे.

तर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील, त्यावेळस मात्र महायुतीचा कस लागणार आहे. राज्यातील सुज्ञ जनतेला भाजपने केलेले फोडफोडीचे राजकारण न पटल्याचा परिणाम मतपेटीतून दिसू शकतो. त्यामुळे महायुतीला कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रात फटका बसण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारचा प्लॅन -

या दोन निवडणुकांत महायुतीसाठी पोषक वातावरण असेल तर पुढील वर्षीच्या डिसेंबर, जानेवारीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा महायुती सरकारचा प्लॅन आहे. तोपर्यंत विविध मुद्द्यातून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून केला जाण्याची शक्यता असली तरी, त्यांना तोपर्यंत तरी सहानभूती मिळण्याची शक्यता कमी आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT