Param Bir Singh, Anil Deshmukh, Sachin Waze Sarkarnama
मुंबई

देशमुख, परमबीरसिंह, वाझे हे तिघंही आले एकत्र अन्...

चौकशी समितीसमोर आज तिघांचीही झाडाझडती होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) आज पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. परमबीरसिंह यांनी देशमुखांवर केलेल्या खंडणीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर आज तिघांचीही झाडाझडती होणार आहे.

चांदीवाल समितीने देशमुखांना हजर करावे, अस वॉरंट सोमवारी बजावले होते. देशमुख यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली असून, ते सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. आज ते आयोगासमोर हजर झाले असून परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपांबाबत जबाब नोंदवणार आहेत. यानंतर त्यांची उलटतपासणीही घेतली जाऊ शकते. आयोगाने आज परमबीरसिंह आणि वाझेलाही बोलावले आहे.

त्यानुसार तिघेही आयोगाच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले आहेत. हे तिघेही मागील काही महिन्यांत पहिल्यांदाच समोरासमोर आले असल्याने त्याबाबत उत्सुकता वाढली आहे. देशमुखांना वाझेला 100 कोटींची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप परमबीरसिंह यांनी केला आहे. त्यानंतर सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केल्याने त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. यादरम्यान ईडीने देशमुखांना अटक केली. तर त्याआधीच मनसुख हिरेन व स्फोटक प्रकरणात वाझेला अटक करण्यात आली होती.

परमबीरसिंह व वाझे हे दोघे सोमवारी आयोगासमोर हजर झाले होते. कार्यालयाबाहेर या दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाली. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या भेटीची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. आता देशमुख, परमबीरसिंह अन् वाझे हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांची समोरासमोर झाडाझडती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आयोगासमोर सुनावणीदरम्यान तिघेही काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, परमबीरसिंह हे सोमवारी चौकशीसाठी समितीसमोर हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले. समितीसमोर सादर करण्यास माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच, कुठल्या साक्षीदाराची उलटतपासणीही मला करायची नाही, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामुळे परमबीरसिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपातून अधिकृतरीत्या माघार घेतल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे देशमुखांना क्लिनचिटच मिळाल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT