Abdul Telgi-Anil Gote-Radheshyam Mopalwar  Sarkarnama
मुंबई

Radheshyam Mopalwar : तेलगी प्रकरण, मोपलवार आणि अनिल गोटेंचा आरोप !

Chaitanya Machale

Samruddhi Mahamarg Scam : समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केल्याचा आरोपावरुन चर्चेत आलेले माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कारभाराचे अनेक किस्से आता समोर येत आहेत.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गाजलेल्या स्टँप पेपर घोटाळ्यातील तेलगी प्रकरणात देखील मोपलवार यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 1995 साली स्टँप कार्यालयात अधीक्षक पदावर कार्यरत असताना आपणच अब्दुल करीम तेलगीला स्टँप आणि पेपर वेंडरचे लायसन्स दिल्याची कबुली मोपलवार यांनी कोर्टात दिली होती.

अब्दुल बनावट स्टँप पेपर घोटाळाप्रकरण चांगलेच गाजले होते. या घोटाळ्यामध्ये अनेक राजकीय मंडळींची नावे समोर आली होती. तेलगी घोटाळा प्रकरणात माजी आमदार अनिल गोटे यांनी तुरुंगवास भोगावा लागला. यामध्ये गोटे हे प्रमुख आरोपी होते. तेलगी प्रकरणात मी केवळ एकटा दोषी नाही, तर यामध्ये अनेक राजकीय बड्या नेत्यांचा सहभाग असून सनदी अधिकारी मोपलवार देखील दोषी असल्याचा आरोप अनेकदा आमदार गोटे यांनी केले होते.

तेलगी प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू असताना आपणच तेलगीला स्टँप आणि पेपर वेंडरचे लायसन्स दिल्याची कबुली मोपलवार यांनी दिली होती. त्यावेळी ते नांदेडचे (Nanded) जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. विशेष मोक्का न्यायालयात मोपलवार यांनी ही कबुली देत हा संपूर्ण निर्णय आपण स्वतः घेतल्याचेही म्हटलं होते.

तेलगी घोटाळ्यातील सूत्रदारांपैकी एक प्रमुख सूत्रधार सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार असल्याचा गंभीर आरोप देखील गोटे यांनी केला होता. मी चार वर्षे जेलमध्ये राहिलो तरी मला तेलगी प्रकरणांमध्ये शिक्षा झालेली नाही. तेलगीकडून मी एक लाख रुपयांची देणगी स्वीकारलेली होती.

ज्या अधिकाऱ्यांनी तेलगीचे स्टॅम्प पकडले त्या मराठी अधिकाऱ्यांना या प्रकरणांमध्ये खूप त्रास सहन करावा लागला. याउलट ज्यांनी एकही स्टॅम्प पेपर पकडला नाही, अशा एसआयटीचे प्रमुख राहिलेल्या एका अधिकाऱ्याने स्वत:चे कौतुक करून घेतले होते. याच अधिकाऱ्याला गृहमंत्री म्हणून काम करणाऱ्या एका वरिष्ठ राजकीय नेत्याने वाचविल्याचा आरोपही गोटे यांनी केला होता.

अब्दुल करीम तेलगी याने एकही बोगस स्टॅम्प छापलेला नाही.नाशिक (Nashik) येथील प्रेसमधून बाहेर पडत असलेल्या स्टॅम्पची हेराफेरी तो करत असल्याचा दावा अनिल गोटे यांनी केला होता. कोट्यवधी रुपयांच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याच्या प्रकरणाशी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार निगडित होते. मला गुंतवण्याचा डाव हा मोपलवार यांचा होता, असेही गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते.

मोपलवार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची तक्रार गोटे यांनी जानेवारी 2017 मध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि पंतप्रधान कार्यालयात दिली होती. एक तोट्यात असलेली कंपनी सात आयएएस अधिकाऱ्यांनी विकत घेतली. यामध्ये राधेश्याम मोपलवार यांचाही समावेश होता. या कंपनीला लगेच वर्षात मोठा फायदा झाला. यातील काही अधिकाऱ्यांनी हे पैसे 'समृद्धी' मध्ये गुंतवले आहेत. त्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यावेळी माजी आमदार गोटे यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT