Radheshyam Mopalwar: राधेश्याम मोपलवारांची 'समृद्धी' महायुतीला शॉक देणार

Rohit Pawar Allegation on Radheshyam Mopalwar: अधिकारी आणि राजकीय नेत्यांमध्ये भ्रष्टाचाराची साखळी असते. ती भेदणे अत्यंत कठिण असते. अशाच राधेश्याम मोपलवार यांनी 3000 कोटींची माया जमवल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Radheshyam Mopalwar
Radheshyam MopalwarSarkarnama
Published on
Updated on

Samruddhi Mahamarg Scam :एखाद्या आयएएस अधिकाऱ्याकडे किती संपत्ती असू शकते? आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपानुसार समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्वाची भूमिका बजावणारे आयएएस अधिकारी राधेशाम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांनी 3000 कोटी रुपये कमावले आहेत. त्यांनी आयएएस म्हणून 26 वर्षे सेवा बजावली आहे. या 26 वर्षांत कुंपणानेनच शेत खाल्ले, असा प्रकार मोपलवार यांनी केल्याचे समोर येत आहे.

मोपलवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या देखरेखीखाली समृद्धी महामार्गाची बांधणी (Samruddhi Mahamarg) झाली आहे.

मोपलवार यांनी 3000 कोटींची माया गोळा केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. हा आरोप महायुती सरकारला शॉक देणारा आहे.

सरकारने केलेल्या कायद्यांची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी, विकासकामे दर्जेदार व्हावीत, त्यात गैरप्रकार होऊ नयेत, याची काळजी घेणे प्रशासनाचे काम असते. मात्र बहुतांश वेळा याच्या उलट चित्र दिसते.

प्रशासकीय योजना, विकासकामांचे राखणदार अशी प्रशासनातील अधिकाऱ्यांची, विशेषतः आयएएस अधिकाऱ्यांची भूमिका असते. ही भूमिका न निभावता बहुतांश अधिकारी आपल्या तुंबड्या भरतात.

Radheshyam Mopalwar
Video Radheshyam Mopalwar: महामार्गात मोपलवारांची 'समृध्दी'; कमावली 3 हजार कोटींची माया; रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली

निवृत्त आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावरही आता असेच आरोप होऊ लागले आहेत. 26 वर्षांच्या सेवेत 3000 कोटी रुपयांची संपत्ती! हे कसे शक्य आहे? प्रामाणिकपणे काम करणारा अधिकारी इतकी संपत्ती गोळा करू शकतो का? अर्थात, याचे उत्तर नाही असेच आहे. गैरप्रकार केल्याशिवाय हे शक्यच होणार नाही, हे सांगायला कुण्या तत्ववेत्त्याची गरज भासणार नाही.

आयएएस म्हणून निवड करताना संबंधित उमेदवाराच्या सामाजिक जाणीवा किती प्रगल्भ आहेत, तो किती प्रामाणिकपणाने काम करू शकेल, याची कोणतीही मोजपट्टी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे नसते. एखादा उमेदवार मुलाखती दरम्यान प्रामाणिक दिसला, त्याच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ दिसल्या तरी तो नंतर तसाच राहील का, याची काही शाश्वती नसते. त्यामुळे असे प्रकार घडतात.

Radheshyam Mopalwar
Pune News: नेत्यांनो, स्मशानभूमीत लोकांच्या भावनांशी खेळायचं बंद करा!

प्रभावी राजकीय नेत्यांचा वरदहस्त लाभला की 'खाओ और खिलाओ' असा प्रकार सुरू होतो. जनतेचे नोकर म्हणून पदावर बसलेले अधिकारी जनतेलाच लुटून खाण्याचे काम करतात. एखाद्या जिल्हाधिकाऱ्याची आणि तहसीलदाराची वरकमाई किती असू शकते? याचे आकडे समोर आले तर लोक ते पाहून चक्रावून जातील.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोपलवार यांच्या संपत्तीचे असेच चक्रावून टाकणारे आकडे सांगितले आहेत. समृद्धी महामार्गाच्या बांधणीच प्रशासकीय अधिकारी म्हणून महत्वाची भूमिका बजावणारे मोपलवार यांची कंत्राटांच्या माध्यमातून 3000 कोटी रुपयांची माया गोळा केली आहे, असा आरोप आमदार पवार यांनी केला आहे.

मोपलवारांच्या दुसऱ्या पत्नीकडे दीडशे कोटी, तिसऱ्या पत्नीकडे तीनशे कोटी आणि मुलींची संपत्ती 850 कोटी रुपयांची आहे. आमदार रोहित पवार यांनी सांगितलेली ही आकडेवारी लोकांना चक्रावून टाकणारी आहे. शिवसेनेचे आमदार फोडण्यासाठी मोपलवारांच्या पैशांचाच वापर केला का, असा भाजपच्या जिव्हारी लागणारा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

समृद्धी महामार्ग विविध कारणांनी वादात राहिला आहे. समृद्धी महामार्गाचे चार महिन्यांत पुन्हा टेंडर काडण्यात आले. ते 55 हजार कोटी रुपयांवर गेले. हे कशासाठी करण्यात आले, याचा उलगडा आता रोहित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर झाला आहे. रोहित पवारांनी एका कंत्राटाचा उल्लेख केला आहे.

Radheshyam Mopalwar
Udayanraje Bhosale News : '...तेव्हा उदयनराजेंनी आमदार गोरेंचा फोटो बाहेर फेकून दिला!'; अनिल देसाईंचा गौप्यस्फोट

समृद्धी महामार्गाचे पॅकेज क्रमांक 11 चे 1900 कोटींचे टेंडर गायत्री प्रोजेक्टला देण्यात आले होते. हे काम आपल्याला जमणार नाही, असे या कंपनीने 2021 मध्ये कळवले. त्यानंतर ते काम हुजूर मल्टिप्रोजेक्ट कंपनीला देण्यात आले. ही कंपनी कोणाची आहे, याची चौकशी झाली पाहिजे. या कंपनीचे 23 लाख शेअर्स मोौपलवार यांच्या कुटुंबियांकडे आहेत.

मोपलवार यांच्या कन्या तन्वी यांच्याकडे या कंपनीचे 3 लाख 98 हजार समभाग, तर भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडे 23 हाजार 645 समभाग आहेत. हुजूर मल्चिप्रोजेक्टचे 4 लाख 98 हजार शेअर्स असलेली मेलोरा इन्फ्रा कंपनी तन्वी मोपलवार यांची आहे, असा आरोप आमदार पवार यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधेश्याम मोपलवार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, मात्र 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जुजबी कारवाई करून त्यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी सोपवली होती, असाही आऱोप आमदार पवार यांनी केला आहे.

मोपलवार आता सेवानिवृत्त झाले आहेत. ते सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉररूमचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत, याकडेही आमदार पवार यांनी लक्ष वेधले आहे. मोपलवार यांच्या नावे 1500 कोटींची मालमत्ता असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.

आमदार पवार यांनी केलेल्या आरोपांमुळे महायुती सरकारची प्रतिमा मलिन होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर महायुतीसाठी हा मोठा झटका आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत समाजात फारसे चांगले बोलले जात नाही, ते का बोलले जात नाही, याचे आणखी एक सबळ कारण रोहित पवार यांच्या आरोपांमुळे समोर आले आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com