Anil Parab
Anil Parab Sarkarnama
मुंबई

Anil Parab News: साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परबांना उच्च न्यायालयाचा पुन्हा दिलासा; 'ईडी'ला दिले 'हे' आदेश

सरकारनामा ब्युरो

Sai Resort Case: दापोलीतील साई रिसॉर्ट मनी लाँडरींग प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना न्यायालयाने आठवड्यात दुसऱ्यांदा दिलासा दिला आहे. दरम्यान, २० मार्च रोजी झालेल्या सुनावणीत २३ मार्चपर्यंत परब यांच्यावर कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. तो दिलेला दिलासा आज कायम ठेवण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने आज परब यांच्यावर २८ मार्चपर्यंत कठोर कारवाई करू नये, असे निर्देश अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिले आहेत.

कामकाजाला कोर्ट उपलब्ध नसल्याने दोपोलीतील साई रिसॉर्ट, मनी लाँडरींग प्रकरणी सुरू असलेली सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अनिल परब (Anil Parab) यांना २० मार्च रोजी दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) आतापर्यंत 'ईडी'ने तीन जणांना अटक केलेली आहे. यात सदानंद कदम, जयराम देशपांडे, सुधीर पारदुले यांचा समावेश आहे. यातील सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक भागिदार आहेत. त्यामुळे परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

'​​​​​​ईडी'च्या कारवाईत दिलासा मिळावा यासाठी अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 'ईडी'ने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली 'ईसीआयआर' रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अनिल परब यांनी दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने अनिल परब यांना २० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते.

दरम्यान, २० मार्च रोजी झालेल्या सुनावणीत २३ मार्चपर्यंत 'ईडी'ने त्यांच्यावर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर आज (ता. २३) झालेल्या सुनावणीत पुन्हा परब यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी कामकाजाला कोर्ट उपलब्ध नसल्याने परब यांच्यावर 'ईडी'ने २८ मार्चपर्यंत कोणतीही मोठी कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहे. त्यामुळे परब यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे.

परबांविरोधात किरीट सोमय्या आक्रमक

दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सतत आवाज उठवला आहे. त्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. यादरम्यान त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना 'ईडी'ने अटक केली. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली होती.

दरम्यान, अनिल परब यांच्यावर केंद्र सरकारने पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल गुन्हा रद्द करण्यात आला आहे. त्याप्रकरणी खेड न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यावेळी अनिल परब यांनी दापोली रिसॉर्टबाबत भूमिका व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, "या रिसॉर्टशी माझा काहीच संबंध नाही. प्रदूषण नियामक मंडळ, पोलीस, कलेक्टर असतील या सर्वांनी रिपोर्ट दिला होता की, रिसॉर्टचे पाणी समुद्रात जात नाही. खेड कोर्टामध्ये हे प्रकरण निकाली निघाले."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT