Mumbai News, 14 Oct : 'अजित पवारांना काहीच कळत नाही. महाराष्ट्र कर्जात बुजाला आहे. राज्यावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज आहे. अर्थमंत्री दहावी पास असून त्यांना काहीच कळत नाही. असेट काय आहेत लायबिलिटीज काय आहेत.
एवढे 9 लाख कोटी आपण कुठून आणणार आहोत?' असा सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिक्षणावरून टीका केली होती.
दमानिया यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे ते शिक्षण अर्धवट सोडल्याचं सांगितलं.
शिवाय त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे. शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर त्यांनी शेती करायला सुरूवात केली, मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला. गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत.
त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टीकोनामुळेच, असं चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
तर आता हीच पोस्ट रिपोस्ट करत अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला आहे. 'मग अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावे. अर्थ मंत्रालय, हा खूप महत्वाचा आणि अतिशय गंभीर आहे. ह्यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास / ज्ञान असणे आवश्यक आहे.
स्वित्झर्लंड हा देश 41285 चौ. किमी आहे आणि महाराष्ट्र 307713 चौ किमी आहे. म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य हे स्वित्झर्लंड या देशाच्या तुलनेत 8 पट मोठे आहे. स्वित्झर्लंड ची GDP 87,33,000 कोटी आहे आणि महाराष्ट्राची 42,67,000 कोटी आहे, म्हणजे अर्ध्याने. महाराष्ट्रावर कर्ज आता 9,32,000 कोटी आहे.
ते कसे कमी होणार ? काही ब्लू प्रिंट आहे का? असे सवाल दमानिया यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता दादांच्या शिक्षणावर टीका करू नये यासाठी भावनिक पोस्ट करणाऱ्या रुपाली चाकणकरांना अजंली दमानिया यांनी त्यांच्याच पोस्टवरून कोड्यात टाकल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.