Anjali Damania|
Anjali Damania| 
मुंबई

अजितदादा, भुजबळांचे मंत्रिपद घालवणाऱ्या दमानिया पुन्हा मैदानात : राठोड, सत्तार निशाण्यावर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (९ ऑगस्ट) पार पडला. यावेळी भाजप (BJP) आणि शिंदे गट (Eknath Shinde) या दोन्ही बाजूंनी ९-९ असे एकूण १८ मंत्री शपथबद्ध झाले. या मंत्रीमंडळ विस्तारानंतर विरोधी पक्षांनी थेट शिंदे सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. खासकरुन मंत्री अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्यावर प्रामुख्याने टीका होत आहे.

शिंदे सरकारमध्ये संजय राठोड यांना थेट मंत्रीपद दिल्याने आता विरोधक आक्रमक झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे.''एकनाथ शिंदे यांना माझा एकच प्रश्न. आनंद दिघे यांचे शिष्य ना तुम्ही? मग संजय राठोड सारख्या माणसाला आनंद दिघे साहेबांनी खपवून घेतलं असतं का? तुमच्याच चित्रपटात तुम्ही दाखवलाय की एका मुलीवर अत्याचार करणार्‍या माणसाला त्यांनी काय शिक्षा दिली. मग तुम्ही त्यांचे शिष्य कसे?," असे ट्विट करत अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांनाच धारेवर धरलं आहे.

तसेच, दोन नावं बघून खूप वाईट वाटलं. संजय राठोड? अशा माणसाला मंत्रिपद कसं देऊ शकतात? अब्दुल सत्तार? यांना मंत्रिपद द्यायची इतकी घाई का? घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती. परत ये रे माझ्या मागल्या सुरू. एका माळेचे मणी.'' असा टोलाही दमानिया यांनी लगावला आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय राठोड यांना थेट महिला आणि बालविकास खातं देण्याची मागणी केली आहे. "चित्रा वाघ या संजय राठोड यांच्या विरोधात लढत होत्या. पण तुमच्या मंत्रिमंडळात महिला नसतील तर संजय राठोड यांनांच नव्या सरकारनं महिला आणि बालविकास खात्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड वनमंत्री होते. मात्र पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने त्यांच्याविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. मात्र, पूजा चव्हाण हिच्या कुटुंबीयांनी त्यांची तक्रार मागे घेतल्याने हे प्रकरण बंद झाले.

महाराष्ट्र सदनाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले होते. दमानिया यांच्या आरोपामुळे भुजबळ यांना मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. पण गेल्या वर्षी मुंबई सत्र न्यायालयाकडून छगन भुजबळ यांच्यासह सहा आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. तर सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावेळी त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता अंजली दमानिया संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मैदानात उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे आता त्या काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT