Sharad Pawar-Soniya-Gandhi Sarkarnama
मुंबई

शरद पवार यांचे नाव येताच कॉंग्रेस नेत्यांच्या कपाळावर आठ्या...

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातच ‘यूपीए’ भक्कम होवू शकते, असा दावा, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षपदाची सुत्रे द्यावीत, असा ठराव युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिबीरात केल्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या नेतृत्वातच ‘यूपीए’ भक्कम होवू शकते, असा दावा करत शरद पवार यांच्या नावाला पटोले यांनी विरोध केला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोनिया गांधी याच्या प्रगल्भ नेतृत्वाखालीच ‘यूपीए’ची बांधणी शक्य असून स्वतः शरद पवार यांचीही अशीच भूमिका असेल. असे स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या नावाचे समर्थन केले आहे. ‘यूपीए’चे नेतृत्व करण्यासाठी शरद पवार सक्षम असून आम्ही अगोदरपासूनच ही मागणी केल्याचे राऊत यांनी सांगितले.

‘यूपीए’च्या नेतृत्वावरून सुरू झालेले मतभेद मिटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर एक समर्थ आणि सर्व विरोधकांना सोबत घेऊन जाणारे सर्वमान्य नेतृत्व उभे करण्याचे आव्हान आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांनी विचारपूर्वक निर्णय घेतल्यास यातून मार्ग निघू शकतो. त्यातून पंतप्रधान मोदींच्यासमोर एक चांगला पर्याय उभा राहण्याची शक्यता आहे. शिवसेना व तृणमूल कॉंग्रेससह आंध्रप्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांचा पवार यांच्या नावाला होकार आहे. मात्र, केवळ या तिघांनी होकार देऊन चालणार नाही. त्यासाठी इतर सर्व पक्षांनी योग्य भूमिका घेण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला तृणमूल,शिवसेना व जगनमोहन रेड्डी यांचा फारसा प्रतिसाद दिसत नाही.वास्तविक पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच ‘यूपीए’चे नेतृत्व करण्याची इच्छा आहे. मात्र, कॉंग्रेससह इतरांचा त्यांच्या नावाला पाठिंबा मिळणे शक्य नसल्याने बॅनर्जी यांच्याकडून पवार यांच्या नावावर होकार येण्याची शक्यता आहे.तडजोड म्हणून देशातील सर्व छोटे-मोठे पक्ष पवार यांच्या नावाला सहमती दर्शवतील. मात्र, कॉंग्रेसला पवार यांचे नेतृत्व मान्य झाले तरच पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात विरोधकांची चांगली आघाडी उभी राहू शकते. सोनिया गांधी यांना काही पक्षांचा विरोध असला तरी कॉंग्रेसशिवाय विरोधकांची भक्कम आघाडी होणे शक्य नाही, हे वास्तव विरोधकांनी स्वीकारायला हवे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT