MLA Ashish Jaiswal sarkarnama
मुंबई

राज्यसभा निवडणूक : मंत्र्यांना टार्गेट करणारे अपक्ष आमदार जयस्वाल हे बॅग घेऊन आले!

अपक्ष आमदार आशिष जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांच्या टिकेने महाविकास आघाडी चिंतेत..

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha election 2022) शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पक्षाच्या सर्व आमदारांना आज संध्याकाळीच बोलावून घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी वर्षा या निवासस्थानी चर्चा केल्यानंतर या आमदारांची मालाड मढ येथील रिट्रीट हॉटेलमध्ये रवानगी करण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या गोंधळाच्या वेळी याच हाॅटेलमध्ये सेना आमदारांना ठेवण्यात आले होते.

ठाकरे यांची 8 मे रोजी औरंगाबाद येथे सभा आहे. या सभेला मराठवाड्यातील सेनेचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे येथील आमदार सभा झाल्यानंतर मुंबईत दाखल होणार आहेत. वर्षा या निवासस्थानी इतर आमदार आज दाखल झाले. या सर्वांनी तीन दिवसांच्या मुक्कामासाठी बॅग भरून या, असा आदेश देण्यात आला होता. या सर्वात लक्षवेधी ठरले ते अपक्ष आमदार आशिष जयस्वाल. जयस्वाल हे सेनेचे जुने नेते आहेत. पक्षाचे तिकिट मिळाले नसतानाही ते रामटेक मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. आताच्या राज्यसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे संजय पवार यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केली होती.

या साऱ्या घडामोडी होत असताना जयस्वाल यांनी आज सकाळीच महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर टीका केली. काही मंत्री हे टक्केवारी घेतल्याशिवाय काम करत नसल्याचा थेट आरोप केला. त्यामुळे अनेक नेत्यांना धक्का बसला. त्यांनी कोणत्या मंत्र्यांचे नाव जाहीर केले नाही. तरी त्यांच्या टिकेची दखल सर्वांनीच घेतली. या मंत्र्यांची नावे आपण मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत. त्याशिवाय कामकाजात सुधारणा कशी होणार, असेही जयस्वाल यांनी सांगितले. महाविकास आघाडीला राज्यसभेत मतदानाचे दिलेले आश्वासन मात्र पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या साऱ्या आरोपांवर काही मंत्र्यांनी दूरचित्रवाहिन्यांवर प्रतिक्रिया देत असे घडत असेल तर चुकीचे असल्याचा खुलासा केला. अपक्ष आमदारांना भाव आल्यामुळे ते असे बोलत असावेत, असाही सूर काहींनी लावला.

उद्धव ठाकरे यांनी बोलविलेल्या बैठकीला जयस्वाल उपस्थित राहणार की नाही, याची उत्सुकता होती. मात्र जयस्वाल हे बॅग भरून आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे साहजिकच शिवसेनेला दिलासा मिळाला. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचा विदर्भात एकही मंत्री नाही. जयस्वाल यांना मंत्रीपद देण्याचे आधी आश्वासन दिले होते. ते पाळले गेले नाही. त्यामुळे या निमित्ताने जयस्वाल यांनी आपले गाऱ्हाणे जाहीररित्या मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची एकत्रित बैठक अद्याप झालेली नाही. मात्र प्रत्येक पक्षाने त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. आमदारांनी मते कशी द्यावीत, यासाठीचे खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT