Meghna Bordikar Sarkarnama
मुंबई

Meghna Bordikar On Viral Video : व्हायरल व्हिडिओ,आरोपांची सरबत्ती; भाजप अडचणीत, अखेर बोर्डीकरांनी मौन सोडलं, म्हणाल्या...

Assembly Session BJP MLA Viral Video : परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप (BJP) महिला आमदार मेघना बोर्डीकर यांनी त्यांच्या विधानसभेतील व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका फाईलमध्ये पैसे ठेवत असल्याचे दिसून येत आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे.एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदान आणि अधिवेशनातील दोन्ही सभागृहाचं कामकाज अशी तारेवरची कसरत चालू आहे.महायुती आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

अशातच भाजपच्या महिला आमदाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओवरुन सभागृहात विरोधकांनी आरोपांची राळ उठवत सत्ताधारी पक्षावर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर या व्हिडिओवर भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप (BJP) महिला आमदार मेघना बोर्डीकर यांनी त्यांच्या विधानसभेतील व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका फाईलमध्ये पैसे ठेवत असल्याचे दिसून येत आहे.त्यावरुन आता मोठा राजकीय गदारोळ झाल्यानंतर आता बोर्डीकर यांनी व्हायरल व्हिडिओबाबत मोठा खुलासा केला आहे.

बोर्डीकर म्हणाल्या, सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते.ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PAकडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले,अशी माहिती त्यांनी दिली.

पण नेमका त्याचाच व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही, अशी नाराजीही बोर्डीकर यांनी व्यक्त केली आहे.आमदार बोर्डीकर यांनी सोशल मीडियावरील X या प्लॅट फॉर्मवर पोस्ट शेअर करत आपलं म्हणणं मांडलं आहे.

नेमकं काय घडलं...?

भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांचा विधानसभेतील एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत. हा व्हिडिओ विधानसभेतील असून बोर्डीकर एका फाईलमध्ये पैसे ठेवत असल्याचे दिसत आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे राज्य प्रमुख महादेव बालगुडे यांनी बोर्डीकर यांचा विधानसभेतील व्हिडिओ सोशल मीडियावरील X वर पोस्ट केला आहे. त्यांनी व्हिडीओ बारकाईने बघा. जो अगदी काही मिनिटांपूर्वीचा आहे असल्याचं पोस्टमध्ये सांगितलं आहे.

तसेच विधानसभेच्या सभागृहात बाकावर बसलेल्या महिला आमदार फाईलमध्ये पैशांच्या नोटा ठेवताना दिसत आहेत.नेमका हा काय प्रकार आहे, असा सवाल बालगुडे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हे पैसे फाईलमध्ये नेमके कशासाठी ठेवले याबाबत उलट- सुलट चर्चा झडू लागल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT