Aditya Thackeray, Nitesh Rane

 

sarkarnama

मुंबई

'मॅव..मॅव..' करीत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

गेली ३९ वर्ष मी शिवसेनेला ओळखतो. पूर्वीची शिवसेना डरकाळी फोडणार होती; आता केवळ मॅव..मॅव करण्यापुरतीच आहे.

ज्ञानेश सावंत

मुंबई : मुंबईतील राणीच्या बागेवरून शिवसेनेला हिणवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि शिवसेनेचे नेते, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे गुरुवारी सकाळीच समोरासोमर आले; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या नितेश यांनी आदित्य पायऱ्यांजवळ येताच 'मॅव... मॅव...' करीत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना डिवचलं. 'आधी वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना आता 'मॅव...मॅव...पुरतीच उरल्याचा टोला नितेश राणे यांनी हाणला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठाण मांडून सरकारविरेधी सूर आळवला. त्यात राणे हे पहिल्याच पायरी बसले होते. तेवढ्यात १० वाजून ५० मिनिटांनी आदित्य ठाकरे विधीमंडळ आवारात आले आणि पायऱ्यावरून सभागृहात जात असतानाच शेजारीच असलेल्या नितेश 'मॅव...मॅव' केले.

विरोधी आमदारांकडे पाहत नमस्कार करीत, आदित्य हे भर्रकन सभागृहाच्या दिशेने गेले. त्यावेळी अन्य आमदारांनीही इतर घोषणाही थांबविल्या होत्या. यानिमित्ताने नितेश यांनी आदित्यला डिवचण्याची संधी सोडली नाही. त्यानंतर नितेश यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “गेली ३९ वर्ष मी शिवसेनेला ओळखतो. पूर्वीची शिवसेना डरकाळी फोडणार होती; आता केवळ मॅव...मॅव करण्यापुरतीच आहे. दोन वर्षांपासून महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही. अधिवेशनाला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ते कधी येणार ? या मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेतील अन्य नेत्यांवर काडीचाही विश्वास नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार कोणाकडे देणार नाहीत."

राणीच्या बागेचे नाव बदल्याचा आरोप करीत, नितेश यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा नाव बदलणार का, असा प्रश्न शिवसेना नेतृत्वाला विचारला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी नितेश यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. राणीच्या बागेच्या प्रकरणात पोलिसांकडे खुलासा केला असल्याचा दावाही नितेश यांनी केला.

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बदनामी करुन दोन समाजात तेढ निर्माण केल्याची तक्रार शिवसैनिकांनी गुरुवारी केली आहे. वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले असल्याचे ट्वीट नितेश राणे यांनी बुधवारी केले होते. या कोनशीलेचा फलक नितेश राणे यांनी टि्वट करुन शेअर केला होता. या उद्यानाचे नाव बदलले नसल्याचे उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितले होते. 'उद्यानाचे नाव बदलले नाही,' असे संबधित अधिकाऱ्यांची स्पष्ट केलं आहे.

''तमाम हिंदूच्या मॅांसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या #ShivSenaचं नाव बदलणार का? असं टि्वट नितेश राणेंनी बुधवारी केलं होत. या टि्वटवरुन राणे आणि शिवसैनिक असं शीतयुद्ध पेटलं आहे. राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT