Crime News  Sarkarnama
मुंबई

Ulhasnagar Crime News: ननावरे दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न: दोघेजण सीसीटिव्हीत कैद

सरकारनामा ब्यूरो

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीय सहायक नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीचे आत्महत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. धक्कादायक म्हणजे ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर आरोपींनी दिवसाढवळ्या त्यांच्या घराचे कुलूप तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती उघड झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी आपल्या पत्नीसह मंगळवारी उल्हासनगर येथील राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केली. पण आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करत आपल्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या लोकांची थेट नावेच सांगितली आहेत. तसेच आपण आत्महत्या का करत आहोत, या संबंधित सर्व पुरावेही आपण घरात काढून ठेवल्याचं ननावरे यांनी व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

ननावरे दाम्पत्याने आत्महत्या केल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली, ते घटनास्थळी दाखल झाले, तिथे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. मात्र पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे बुधवारी दुपारच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी ननावरे यांच्या बंगल्याच्या दरवाज्याचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक जागरूक नागरिकांनी याबाबत हस्तक्षेप करत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. पण ते दोघेही बंगल्याच्या आवारातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले दोघेजण ननावरे यांच्या बंगल्यात का आले असावेत, त्यांचा हेतू काय होता, त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी हा प्रयत्न केला का, ननावरेंच्या बंगल्याबाहेर तैनात करण्यात केलेले पोलीस नेमके त्याच वेळी कुठे गेले होते, असे अनेक प्रश्न या घटनेने उपास्थित झाले आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT