dada bhuse rahul narvekar bachhu kadu sarkarnama
मुंबई

Bacchu Kadu : बच्चू कडू शिंदे सरकारवर बरसले, भुसेंनी प्रत्युत्तरात भरला दम; वातावरण तापताच अध्यक्ष मध्यस्थी करत म्हणाले...

Bacchu Kadu On Shinde Govt : अन्याय करणाऱ्या अफजलखानचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोथळा काढला होता. मग, तुम्ही अन्याय का करत आहात? असा सवाल कडूंनी सरकारला विचारला आहे.

Akshay Sabale

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून आमदार बच्चू कडू आणि मंत्री दादा भुसे आमने-सामने आले. सगळ्यांची सेवा करणाऱ्या एस.टी कर्मचाऱ्याला तुम्ही 12 हजार रूपये पगार देता, लाज वाटत नाही का? असा खडा सवाल बच्चू कडूंनी दादा भुसेंना विचारला.

बच्चू कडूंनी ( Bacchu Kadu ) 'लाज' हा शब्द वापरल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी केली. तसेच, 'लाज' हा शब्द असंसदीय असून तो कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असं अध्यक्ष नार्वेकरांनी सांगितलं.

घडलं काय?

आक्रमक होत बच्चू कडू म्हणाले, "विधानसभा अध्यक्ष नार्वेकर ( Rahul Narwekar ) यांच्या पाठीमागे असलेल्या भींतीवर 'सत्यमेव जयते' लिहिलं आहे. विधानसभा अध्यक्ष आणि भुसेंच्या कार चालकाला मिळत असलेला पगार एसटी कर्मचाऱ्याला का मिळत नाही? हे दादा भुसेंनी फक्त सांगावं. तुमचा चालक एसीमध्ये फिरतो. एसटीत बसले की माणूस घामाघूम होतो. कर्मचाऱ्यांचे कष्ट अधिक जास्त आहेत. मग, त्यांचा पगार का कमी आहे?"

"अन्याय करणाऱ्या अफजलखानचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोथळा काढला होता. मग, तुम्ही अन्याय का करत आहात? सरकारच कायदा मोडत असेल, तर कुणाच्या थोबाडीत मारायचं? याचं सत्य आणि असत्य दादा भुसेंनी सांगितलं पाहिजे. तुम्हा राग का येत नाही? याची थोडी लाज वाटली पाहिजे," अशा शब्दांत कडूंनी खडसावलं आहे.

"तुमच्या चालकाला 20 ते 30 हजार रूपये तुम्ही पगार देता. सगळ्यांची सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याला तुम्ही 12 हजार रूपये पगार देता. लाज वाटत नाही का? याचा राग का येत नाही? याचं उत्तर द्यावं. असत्य वागत असाल, तर त्याचं सत्य किती करणार हे सांगा?" असा सवाल कडूंनी दादा भुसेंना केला.

यानंतर दादा भुसे उभे राहिले आणि कडूंना सूचक इशारा दिला. "बच्चू कडूंचा मी आदर व्यक्त करतो. मी सुद्धा आक्रमक पद्धतीनं उत्तर देऊ शकतो," असं दम दादा भुसेंनी कडूंना भरला.

परत मध्यस्थी करत राहुल नार्वेकर म्हणाले, "सभागृहाला एक परंपरा आहे. असंसदीय शब्दांबाबत नियम आहेत. आपल्या भावना व्यक्त करताना असंसदीय भाषा वापरणे चुकीचं ठरेल. बच्चू कडूंनी वापरलेली भाषा मी तपासून घेईल. त्यात असंसदीय शब्द वापरले असतील, ते रेकॉर्डवरून काढले जातील."

तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते, सुधीर मुनगंटीवार यांचं उदाहरण देत विषय संपवला. "आज फक्त लाज आणि शरम काढली जात आहे. त्याच हिशोबानं मुनगंटीवार यांचं अर्ध भाषण काढून टाकावं लागेल. कडूंनी लाज काढली, तर तुम्ही शरम बाळगू नका. विषय संपतो," असं कडूंनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT