Bageshwar Baba News
Bageshwar Baba News  Sarkarnama
मुंबई

Bageshwar Baba News : बागेश्वर बाबांनी उधळली मुक्ताफळे; संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं..

सरकारनामा ब्युरो

Bageshwar Baba News : आपल्या चमत्काराच्या दाव्यामुळे अडचणीत आलेले बागेश्वर बाबा ने आता आणखी एक कारनामा समोर आला आहे. संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करत त्याने नव्या वादाला फोडणी दिली आहे. 'संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची म्हणून त्यांनी देवाचा धावा केला. अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबाने उधळली आहेत.

बाबाच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्याच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनसह भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनेही बागेश्वर बाबाच्या विधानाचा निषेध केला आहे. त्यांच्या या वादामुळे मात्र नव्याने राजकारण तापण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे

काय म्हणाले बागेश्वर बाबा?

“संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा होते. पण त्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारहाण करायची. त्यांना कुणीतरी विचारलं की, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा असल्याचं तुकाराम महाराजांनी सांगितलं.

त्या व्यक्तीने पुन्हा विचारलं, यात देवाची कृपा काय? तर तुकाराम म्हणतात की, प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. देवाच्या भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाली म्हणून मला देवाची सेवा करण्याची संधी मिळाली. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी मिळाली.''

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून निषेध

दरम्यान, बागेश्वर बाबांच्या या वक्तव्यांनंतर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी बागेश्वर बाबांचा निषेध केला आहे. ''बागेश्वर बाबांनी जगतगुरु तुकाराम महाराज यांच्याबद्दल बोलताना चुकीचा संदर्भ दिला. त्यातून त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. यामुळे केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाल्याचं तुषार भोसले यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, बागेश्वर बाबांनी तुकारामांची माफी मागावी, अशी मागणीही तुषार भोसले यांनी केली.

खासदार सुप्रिया सुळेंकडून निषेध

तर, बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबाबत केलेलं आक्षेपार्ह विधान दाखवणं बंद करा. मी सुद्धा अध्यात्म मानते. संत तुकाराम महाराजांबद्दल कोणी काही बोलले असेल तर त्याचा जाहीर निषेध केलाच पाहिजे, अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे.

रोहित पवारही संतापले

तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचा निशेध केला आहे. ''बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत.. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही.'' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा! या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळींमधून अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावं असंही म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT