Eknath Shinde News भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या राज्यातील सर्वात मोठ्या `इंद्रायणी थडी` चे २५ जानेवारी उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तर, आता या महोत्सवाचा समारोप आज (ता.२९) दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात कालपासून तीनदा बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, या जत्रेचा समारोप आज सायंकाळी समारोप करून मुख्यमंत्री नंतर मावळातील श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर जाणार असे त्यांचे कालपर्यंत शेड्यूल होते.भंडारा डोंगरावरील श्री संत तुकाराम महाराज मंदिर व माघ दशमी सोहळ्यास ते हजर राहणार आहेत. मात्र,आज अचानक या दौऱ्यात बदल करण्यात आला. दुपारी प्रथम भंडारा डोंगरावर जाऊन नंतर भोसरीत ते येणार असं ठरलं. नंतर त्यात पुन्हा बदल झाला.आता ते प्रथम सायंकाळी चार वाजता भंडारा डोंगरावर जाऊन त्यानंतर पाच वाजता भोसरीत इंद्रायणी थडीत येणार आहेत.त्यांच्या या दौऱ्यातील बदलामुळे शेवटच्या क्षणी आयोजकांची,मात्र धांदल उडाली.
माघ शुद्ध दशमी व जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस वसंतपंचमीच्या निमित्ताने श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर सुरु असणा-या अखंड हरीनाम सप्ताहास व गाथा पारायण सोहळ्यास मुख्यमंत्री भेट देणार आहेत. डोंगरावरील तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या कामाची पाहणी ते यावेळी करतील.श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने हे जागतिक किर्तीचे भव्यदिव्य मंदिर 125 कोटींहून अधिक रुपये खर्च करून साकारले जात आहे. त्यात तुकाराम महाराजांचे सर्वात मोठे शिल्प असणार आहे.
या मंदिराच्या कामकाजाची पाहणी करावी अशी विनंती मावळचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.या मंदिरासाठी ३ जानेवारीला निधन झालेले भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांनी पाच कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तीर्थक्षेत्र देहूगावात तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री भंडारा डोंगरावर जाणार आहेत.त्यांची हा दौरा अर्धा तासाचा आहे.
भंडारा डोंगर भेटीनंतर मुख्यमंत्री सायंकाळी पाच वाजता भोसरीत इंद्रायणी थडीत येणार आहेत. या यात्रेला पहिल्या तीन दिवसांत वीस लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली असून साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. या महोत्सवाची पाहणी केल्यानंतर साडेपाच वाजता मुख्यमंत्री मुंबईला रवाना होण्याकरिता पुणे विमानतळाकडे प्रयाण करतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.