Balasaheb Thorat, Devendra Fadnavis Latest News
Balasaheb Thorat, Devendra Fadnavis Latest News sarkarnama
मुंबई

रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला मग महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहीहंड्या फोडायच्या का ?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्रासाठी महत्वाचा असलेला 'वेदांता' ग्रुपचा प्रकल्प हा गुजरातला नेण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार आहे. हा प्रकल्प राज्याच्या बाहेर गेलाच कसा,असा सवाल विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारला विचारला जात आहे. यामुळे राज्य सरकारची पुरती गोची झाली आहे.

दरम्यान कॅाग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. १.५८ लाख कोटींचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातलाच कसा गेला? रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला आणि महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का ?, असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. (Balasaheb Thorat, Devendra Fadnavis Latest News)

थोरात आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार सोहळे व देवदर्शनात व्यस्त आहेत. त्यांनी थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता. आता गुंतवणूकही गेली आणि लाखो रोजगारही गेले. हे का झाले? याचा खुलासा सरकारने करावा. बुलेट ट्रेनची गरज नसतानाही महाराष्ट्राच्या माथी हा प्रकल्प लादला गेला. आता पुन्हा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत. याचे गांभीर्य या सरकारला नाही. १.५८ लाख कोटींचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातलाच कसा गेला? रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला आणि महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का? अशा शब्दात थोरातांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

याबाबत विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवारांनी देखील सरकारवर टीका केली असून हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी प्रयत्न करावे यासाठी त्यांनी त्यांची भेट घेतली आहे. तर राज ठाकरे यांनी या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत 'वेदांता' प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, 'वेदांता' ग्रुप व तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे 60 : 40 असे जॉईन्ट व्हेंचर असणारा आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असणारा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला जाण्याच्या वाटेवर असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणुक राज्यात होणार होती. याप्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध होणार होता. हा प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंपनीकडून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगाणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा करण्यात आली होती, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT