Balasaheb Thorat-jitendra awhad-Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Assembly Session : थोरात म्हणाले, ‘त्यांच्या मुसक्या बांधा’; फडणवीसांनी मुसक्या बांधण्याचे जाहीरच केले...

तुमचं मत मुसक्या बांधून आणा असं तर आहे. पण आमचं तर म्हणणं असं आहे की त्यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे.

सरकारनामा ब्यूरो

Mumabi News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एका ट्विटर हॅंडलवर अवमानकारक लिखाण केल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडत संशयित आरोपीवर कारवाईची मागणी केली. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर उत्तर दिले. त्यावर काँग्रेसच विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी आरोपींना मुसक्या बांधून भररस्त्यावर फिरवलं पाहिजे, अशी मागणी केली. फडणवीसांनी मुसक्या तर बांधणारच पण त्यांना फाशी दिली पाहिजे, असे सांगून हे सर्व कायद्यानुसार करावे लागेल, असे उत्तर दिले. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने थोरांनी अखेर सभात्याग केला. त्याचाही फडणवीसांनी समाचार घेतला. (Balasaheb Thorat's walkout over his offensive writing about Savitribai Phule)

सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलं. हा गुन्हा मे महिन्यात घडला, त्यानंतर आरोपींना अजूनही पकडलं गेलं नाही. सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली आहे. या आरोपींना कधी पकडण्यात येईल, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपस्थित केला.

आव्हाडांच्या प्रश्नावर गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, भारद्वाज स्पीक नावाच्या हॅंडलने सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक लिखाण केलं होतं. सावित्रीबाई फुले या स्त्रीशिक्षणाच्या जनक नव्हत्या, अशा प्रकारचं लिखाण केले होते. त्याचे आम्ही सर्वजण निषधेच करतो. त्यावेळी अजित पवार, छगन भुजबळ आणि आव्हाड तुम्ही स्वतः मुंबई पोलिस आयुक्तांकडे गेला होता. आमच्या मनीषा चौधरी याही एक शिष्टमंडळ घेऊन आयुक्तांना भेटल्या होत्या. आपण तत्काळ त्याच दिवशी गुन्हा दाखल केला. तसेच ते शेअर करणाऱ्या वेबसाईटवरही गुन्हा दाखल केला.

यामध्ये भारद्वाज स्पीक हा लिहिणारा आहे. त्याबाबत ट्विटरला तीन पत्रे लिहून त्याची माहिती मागितली आहे. आपण कितीही अर्जन्सी मागितली तरी दोन ते तीन महिने ती माहिती मिळविण्यात जातात. ट्विटर इंडियाच्या संपर्कात पोलिस असून त्यामुळे लवकरात लवकर कुठल्याही परिस्थितीत भारद्वाज स्पीकवर कारवाई करणार आहोत. तसेच, इंडिक्ट टेल्स, हिंदू पोस्ट यांच्यावरही गुन्हा दाखल केलेला आहे. महापुरुषांच्या बाबतीत असं लिखाण करणाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नाही, असे उत्तर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

फडणवीस यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्या तीव्र भावना मांडल्या. ते म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे. मात्र, दुर्दैवाने असं लिहिलं जातं आणि त्यांच्यावर तीन महिन्यांनंतरही कारवाई होत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, असं आमचं मत आहे. ज्यांनी लिहिलं आहे, त्यांना मुसक्या बांधून आणलं पाहिजे. त्यांना मुसक्या बांधून रस्त्यांवरून फिरवलं पाहिजे, इतकं वाईट त्यात लिहिलं आहे. त्यांच्यावर कधी कारवाई करणार, हे अगोदर आम्हाला सांगा, असा आक्रमक पवित्रा थोरात यांनी घेतला.

फडणवीस म्हणाले की, तुमचं मत मुसक्या बांधून आणा असं तर आहे. पण आमचं तर म्हणणं असं आहे की त्यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण, आपल्याला कायद्याचे पालन करावं लागतं. तुमच्या आणि माझ्या भावना कितीही तीव्र असल्या तरी कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला काम करावं लागतं. काहीही झालं तर संबंधित व्यक्तीला शोधून काढलं जाईल आणि त्याला मुसक्याच बांधल्या जातील.

थोरातांचा सभात्याग; फडणवीसांनी घेतला समाचार

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बाळासाहेब थोरात यांनी सभात्याग केला. त्याचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी त्या प्रश्नावर सभात्याग केला आहे. मात्र, थोरातांसारख्या ज्येष्ठ नेत्याकडून माझी अशी अपेक्षा आहे की अशा प्रश्नात राजकारण करू नये. सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असूच शकत नाही. हे सभागृह एक आहे. केवळ मतांसाठी अशा प्रकारचे राजकारण होत असेल तर त्याचाही निषेध केला पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT