Mumbai Politics : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी बेस्ट पतपेढीची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्याला कारणही तसंच मोठं आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांनी एकच पॅनेल उतरवले होते. दोन्ही पक्षांची युती म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधुंची एकी, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. या निवडणुकीचा निकाल आज लागणार असून अद्याप मतमोजणी सुरू आहे.
मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडची निवडणूकीसाठी सोमवारी मतदान झाले. आज मतमोजणी सुरू आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे त्यामध्ये अडचणी येत असून निकालाला विलंब लागत आहे. अद्याप अधिकृतपणे 21 पैकी एकाही जागेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, ठाकरेंच्या काही पदाधिकाऱ्यांकडून विजयाच्या पोस्ट सोशल मीडियात करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत ठाकरे विरुध्द भाजप व एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी लढत होती.
निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेनेच्या उत्कर्ष पॅनलला 21 पैकी 21 जागा मिळाल्याच्या पोस्ट काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनी या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दणदणीत विजय झाल्याची पोस्ट एक्सवर केली आहे. विजय बेस्ट, निर्णय बेस्ट, माणसं त्याहून बेस्ट असंही त्यांनी म्हटले आहे.
मनसेचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष सतीश फाले पाटील यांच्या एक्स हँडलवरून बेस्टच्या निवडणुकीत 21 पैकी 21 जागांवर विजय झाल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे काही शिवसैनिक व मनसैनिकांनी विजयाच्या पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा नेमका निकाल काय लागला, याबाबत उत्सुकता वाढली आहे. अद्याप कोणत्याही नेत्यांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप महापालिका निवडणुकीसाठी अधिकृतपणे युतीची घोषणा केलेली नाही. मात्र, दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून तसे संकेत दिले जात आहेत. बेस्टमधील निवडणुकीतील युती त्याचीच नांदी असल्याची चर्चा आहे. तसेच हा विजयही ठाकरे बंधुंसाठी खास असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.