.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Supreme Court : सुप्रीम कोर्टात मंगळवारी एका हत्या प्रकरणाशी संबंधित खटल्यावर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने पोलिस अधिक्षकांना झाप-झाप झापले. पोलिस अधिक्षकांनी थेट हत्या प्रकरणातील आरोपीच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे पाहून न्यायमूर्तीही अवाक झाले. त्यानंतर त्यांनी आयपीएस अधिकाऱ्याला कर्तव्याची आठवण करून देत फटकारले.
बिहारमधील पाटणाचे पोलिस अधिक्षक (विशेष शाखा) अशोक मिश्रा यांना सुप्रीम कोर्टाच्या संतापाला सामोरे जावे लागले. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमनुल्लाह आणि एसव्हीएन भाट्टी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाले. मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वी एका हत्या प्रकरणातील आरोपीला क्लीन चिट देणारे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल केले होते. विशेष म्हणजे या आरोपीला यापूर्वी याचप्रकरणात शिक्षाही सुनावण्यात आली होती.
पोलिस अधिक्षकांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र थेट आरोपपत्र आणि ट्रायल कोर्टाच्या निकालालच आव्हान देणारे होते. आज कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान मिश्रा यांना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. यावेळी त्यांनी जाहीरपणे कोर्टाची माफी मागितली. हा आपल्यासाठी मोठा धडा होता, असेही ते म्हणाले. पण त्यानंतरही खंडपीठाने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत मिश्रा यांना चांगलेच फटकारले.
कोर्ट म्हणाले की, तुम्ही तमुमचे काम कशापध्दतीने करत आहात, हे पाहून त्रास झाला. तुम्ही तुमच्या प्रतिज्ञापत्रातील प्रत्येक परिच्छेद वाचलेला नाही. तुमचे डोके वापरून न्यायदान करा. तुम्ही ज्या पदावर आहात, त्यानुसार लोकांना न्याय द्या. संविधानाशी एकनिष्ठ राहा, तुमच्या ब़ॉससाठी काम करू नका. त्यांनी तुम्हाला बेकायदेशीर काम करायला सांगितले तर तुमच्या शिक्षेसाठी तयार राहा. ते जास्तीत जास्त काय करू शकतात, त्यासाठी तयार राहा. ते तुमची बदली करतील. तयार राहा. तुमचे वेतन कमी होणार नाही.
इतरांना जो सन्मान मिळत नाही, तो तुम्हाला मिळतो. हाच तुमच्यासाठी खरा आदर आहे. तुमच्या ज्या खुर्चीवर असता, त्यामुळेच तुम्हाला त्यावेळी तो आदर मिळतो, असा सल्लाही कोर्टाने दिला. पोलिस अधिक्षकांना खडसावल्यानंतर कोर्टाने त्यांचा माफीनामाही स्वीकारला. मात्र, त्यांना सक्त ताकीतही दिली. दरम्यान, पाटणा हायकोर्टाने हत्या प्रकरणातील ट्रायल कोर्टाच्या शिक्षेच्या निकालाला स्थगिती दिल्यानंतर त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात ही सुनावणी झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.