Sunil Tatkare, Bharat Gogawle Sarkarnama
मुंबई

Bharat Gogawle News : मी मंत्री कधी होणार हे तटकरेच सांगतील; गोगावलेंची शेरेबाजी

Raigad Politics : दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात एकमेकांवर टोलेबाजी करीत तोंडसुख घेतल्याने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.

Mangesh Mahale

Goregaon News : आदिती तटकरे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद चव्हाट्यावर आला होता. मंत्रिपदासह रायगडचे पालकमंत्रिपद मलाच हवे, असा अट्टाहास भरत गोगावले यांचा आहे. गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तरी तटकरे कुटुंब आणि गोगावले यांचे जिल्ह्याच्या राजकारणात सूर जुळणे कठीणच मानले जाते होते, पण काही दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे-गोगावले यांच्यात मनोमिलन झाले.

राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष (अजित पवार गट), खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्‍यात मनोमिलन झाल्‍यानंतर रायगडमधील दोघेही विरोधक रविवारी पहिल्‍यांदाच एकाच व्‍यासपीठावर आले.

दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात एकमेकांना टोलेबाजी करीत तोंडसुख घेतल्याने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली. गोरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍मारक सभागृहाच्‍या कामाचा प्रारंभ झाला. यानिमित्ताने दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते.

आमचा काही नंबर लागत नाही...

गोगावले यांच्या मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून दोघांनीही शाब्दिक टोलेबाजी करीत एकमेकांना चिमटे काढले. खासदार तटकरे यांच्या दिल्लीवारीचे उदाहरण देत आदिती तटकरे मंत्री झाल्‍या, आमचा काही नंबर लागत नाही. आम्‍ही मंत्री कधी होणार ते आता तटकरेसाहेबच सांगतील, असं भरत गोगावले या वेळी म्‍हणाले.

नशिबात जे आहे आहे ते मिळणारच ...

नवरात्रीचे दिवस आले आहेत, शपथविधी जवळ आला असेल, मला वाटलं भरतशेठ जॅकेट घालून आले असतील. आमच्‍या तुम्‍हाला शुभेच्‍छा आहेतच. विरोधात होतो तेव्‍हाही शुभेच्‍छा होत्‍या. ज्‍याच्‍या नशिबात जे आहे ते मिळणारच आहे, असे टोलेबाजी करीत खासदार तटकरे यांनी गोगावले यांना प्रत्युत्तर दिले. खासदार आमदारांच्या या शेरेबाजीमुळे उपस्थितांमध्‍ये चांगलाच हशा पिकला.

पालकमंत्री हा शिवसेनेचा असावा...

महाविकास आघाडी सरकारमध्ये नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदिती तटकरे यांची राज्यमंत्री पदावर वर्णी लागली होती, पण तीन वेळा आमदार होऊनही शिवसेनेच्या भरत गोगावले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्याने जिल्ह्याचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असावा, असा आग्रह तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी लावून धरला होता.

गोगावले मंत्री होणार?

मात्र, उद्धव ठाकरे यांनी तो न जुमानता आदिती तटकरे यांना पालकमंत्री केले. त्यानंतर निधी वाटपावरून, श्रेयवादावरून तटकरे-गोगावले यांच्यात वाद होत राहिले. त्यामुळे गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या तीनही आमदारांनी पालकमंत्री हटावचा नारा दिला होता, पण उद्धव ठाकरेंनी त्यांची मागणी धुडकावून लावली होती. गोगावले आता शिंदे गटात आहेत, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत, ही इच्छा गोगावलेही लपवून राहिलेले नाहीत. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळते की नाही, हे लवकरच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT