Bhiwandi Mahanagarpalika Samajwadi Party  Sarkarnama
मुंबई

Bhiwandi Politics: भिवंडीत मोठी राजकीय उलथापालथ! भाजप आमदाराच्या निकटवर्तीयाशी हातमिळवणी; 'सपा'च्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

Samajwadi Party News: भिवंडीच्या महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांनी भिवंडीतील स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

Deepak Kulkarni

Bhiwandi News: भिवंडीच्या महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांनी भिवंडीतील स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या सर्व नगरसेवकांवर भाजप आमदारा समर्थक उमेदवाराला स्वीकृत नगरसेवक पदासाठी पाठिंबा दर्शवल्यामुळे सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

समाजवादी पक्षाच्या भिवंडी महानगरपालिकेच्या 6 नगरसेवकांचं राजकीय भवितव्य अडचणीत आले आहे. समाजवादी पार्टीच्या आदेशाचं उल्लंघन करत या नगरसेवकांनी भाजप आमदार महेश चौघुले यांचे निकटवर्तीय भरत जंगलानी यांच्या नावाची शिफारस स्वीकृत नगरसेवक पदासाठी केली असा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षानं सहा नगरसेवकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

भिवंडी महानगरपालिकेच्या हकालपट्टी झालेल्या सहा नगरसेवकांमध्ये गटनेते आरिब याकूब शेख, काशफी शाफ मोमिन, आजीब जमाल मोमिन, अन्सारी शबाना शमीम, शेख सलमाबानो मोहम्मद अक्रम आणि खान अमल उबैद यांचा समावेश आहे. ही कारवाई समाजवादी पक्ष मागे घेणार की त्यांचं निलंबनही होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महानगरपालिकेत बुधवारी (ता.14) नऊ स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. ही घोषणा महानगरपालिकेकडून विशेष महासभेत महापौर नारायण चौधरी यांनी केली. भिवंडी महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपदी भाजपकडून सुगंधा टावरे,रवी सावंत, काँग्रेसनं इम्रान मोहम्मद एच.अन्सारी,अरफात ए. शेख,सलीम अहमद शेख यांना संधी दिली आहे.

तर शिवसेनेकडून संजय काबुकर,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गिरीश म्हात्रे, समाजवादी पक्षाकडून भरत जंगलानी आणि कोणार्क विकास आघाडीकडून मयूर विलास पाटील यांना भिवंडी महानगरपालिकेच्या स्वीकृ नगरसेवकपदाची लॉटरी लागली आहे. या नियुक्तीनंतर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

याउलट सपाकडून आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरुन भिवंडी महापालिकेत काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांनीच त्यांच्या पक्षाच्या गटनेत्यांनीच सुचवलेल्या नावांवर आक्षेप नोंदवल्याचं पाहायला मिळालं आहे.

याचदरम्यान, आता काँग्रेसचे शहराध्यक्ष आबिद खान यांनी महानगरपालिकेतील पक्षाचे गटनेते तथा उपमहापौर तारिक मोमीन यांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी सुचवलेल्या तीन नावांना विरोध दर्शवला आहे. तसेच त्यांनी विरोध दर्शवलेली नावे मागे घ्यावी,अशी मागणीही केली.

तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रियाज आझमी यांनी भरत जंगलानी यांच्या नावाऐवजी सरफराज शेख यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर करण्याची मागणी आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवरून पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT