Mumbai : राज्यात पहाटेच्या शपथविधीनंतर आज दुपारच्या शपथविधीने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही आमदारांना फोडून शिंदे फडणवीस युती सरकारसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासोबत आलेल्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होता. काही दिवसांपुर्वी अजित पवारांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद मागितले होते. यावर 6 जुलैला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल असे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. याला काही मिनिटे उलटत नसतानाच अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन राजभवनाच्या दिशेने रवाना झाले. आणि पुढच्या काही वेळातच मंत्रिपदाचा शपधविधी पाहायला मिळाला.
आता राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोर धरु लागली आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना कोणते मंत्रीपद मिळणार? याबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.
अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासोबत घेण्यात आलेल्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जलसंपदा खाते मिळण्याची शक्यता आहे. हे तेच खाते आहे ज्यावरुन अजित पवार यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) यांच्या आघाडीचं सरकार सत्तेवर असताना अजित पवार जलसंपदा खाते संभाळत होते. त्यांच्याकडे विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे अध्यक्ष पदही होते. त्यावेळेस झालेल्या कथित सिंचन घोटाळ्यावरुन अजित पवारांना घेरण्यात आले होते. आघाडीच्या सरकारमध्ये कथितरीत्या 72 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. 2014 च्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा लावून धरण्यात आला होता.
त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे काही तासांचे सरकार अस्तित्वात आले होते. याच्या काही तासातच अजित पवारांना सिंचन घोटाळा प्रकरणातून दिलासा मिळाला होता. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निर्णनानुसार अजित पवारांशी संबंधित 9 प्रकरणांची चौकशी थांबविण्यात आली.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. शिवसेना-भाजपचं फिस्कटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्याने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.