Shivsena Dasara Melava 2023  Sarkarnama
मुंबई

Shiv Sena Dasara Melava News : शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार; शिंदे गटानं मैदान बदललं...

Mangesh Mahale

Mumbai : शिवाजी पार्क अन् शिवसेनेचं अतूट नातं आहे. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यावरून (dasara melava) वाद पेटला होता. यंदाही हा वाद निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे गटाने सावध भूमिका घेत महिनाभरापूर्वीच अर्ज दाखल केला होता. याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. शिवाजी पार्क मैदान हे ठाकरे गटाला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाने शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षी दोन्ही गटांनी (ठाकरे गट-शिंदे गट) मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावे, यासाठी महापालिकेकडे अर्ज केला होता. हा वाद न्यायालयात गेला होता. महापालिकेने ठाकरे गट-शिंदे गट यांना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास नकार दिला होता. याबाबतचे पत्र महापालिकेने दोन्ही गटाला दिले होते.

महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत दोन्ही पक्षांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळून ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिली होती.

यंदाही शिवाजी पार्क मिळावं म्हणून ठाकरे आणि शिंदे गटाने (Eknath Shinde) मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केले होते. शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळणार, असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत होता. त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा पार पडणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. हा वाद पुन्हा न्यायालयात जाणार का, अशी चर्चा होती, पण शिंदे गटाने आपला अर्ज मागे घेतल्याने ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दसरा मेळाव्यासाठी आम्ही महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी साम टीव्हीसोबत बोलताना दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर (Shivaji Park) पहिला दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) घेतला होता, तेव्हापासून शिवाजी पार्क आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. दसऱ्याच्या दिवशी राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवाजी पार्कवर येतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT