Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Chandrashekhar Bawankule on uddhav thackeray : मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत...भन्नाट!; बावनकुळेंनी ठाकरेंना झोडपले

Maharashtra Politics : चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होऊन दोन-चार तास झाले नाहीत, तेच भाजप नेत्यांचे पित्त खवळले आहे. ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशेने बाण सोडले; पण त्यामुळे मोदींच्या आधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच घायाळ झाल्याचे दिसते.

हिंदुत्वाची मशाल उद्धव ठाकरेंनी विझवली, सोनिया गांधींपुढे मुजारे करणारे ठाकरे, तुमचे आमदार नाकाखालून निघून गेले, तुम्ही महागद्दार आहात, तुमचे नेतृत्व नाकर्ते आहे. अशा डझनभर शब्दांनी बावनकुळेंनी ठाकरेंना अक्षरशः झोडपून काढले. ठाकरेंची मुलाखत आणि भाजपच्या जशास तशाच्या भूमिकेमुळे आता राज्यभर राजकीय वारे घोंगावणार आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी "आवाज कुणाचा" या पॉडकास्ट माध्यमातून 'सामना'ला मुलाखत दिली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंची मुलाखत घेतली आहे.या मुलाखतीवरुन भाजपच्या नेत्यांनी टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.

"तुम्हाला तुमच्या आमदारांचं नेतृत्व करता आलं नाही. ते तुमच्या नाकर्तेपणामुळे नाकाखालून निघून गेले. मुख्यमंत्री असताना तुम्ही मातोश्री बाहेर पडले नाहीत आणि आता लोकांना दोष देत आहात," अशा शब्दात बावनकुळे यांनी ठाकरेंच्या मुलाखतीचा समाचार घेतला आहे. "मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत...भन्नाट!'असे टि्वट करीत त्यांनी ठाकरेंना चिमटा घेतला आहे.

"कुटनीतीला कुटण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. कारण २०१९ साली युतीत निवडणूक लढून तुम्ही महागद्दारी केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. तेव्हांच तुम्ही नितीमत्ता पायाखाली तुडवली होती. त्यामुळे घरात बसून निती-अनितीच्या गप्पा तुम्ही मारु नका," असा सल्ला त्यांनी दिला आहे.

बावनकुळे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "घराणेशाही टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या ‘इस्ट इंडिया‘ कंपनीचं कडबोळं आता लोकशाही टिकवण्याच्या गप्पा मारत आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझा मुलगा एवढाच विचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे,"

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT