Mumbai News : विधानसभेतील सर्वात युवा आमदार रोहित पाटील यांनी त्यांचे पहिलं भाषण सभागृहात केले. विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी रोहित पाटील करत असलेल्या भाषणावेळी संपूर्ण सभागृहात शांतता पसरली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमच्याकडे लक्ष राहू द्या, असे भाषणातून सांगताना त्यांनी एका अभंगाची ओवी म्हणून दाखवली. फडणवीससाहेबांचे अभिनंदन, 'अमृताहुनी ही गोड नाम तुझे देवा', असं संतांनी म्हटल्याचे पाटील यांनी म्हटले. त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. फडणवीस यांना देखील स्वतःला यावर हसू आवरता आले नाही.
राज्यात महायुती सरकार (Mahayuti) स्थापन झाले असून, विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदावर निवड झाली. यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी अभिनंदनपर भाषणे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी देखील आज विधानसभेत पहिले भाषण केले. रोहित पाटलांच्या भाषणावेळी सभागृहातील सर्व आमदार शांतपणे ऐकत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील म्हणाले, "विधानसभा अध्यक्षांचे मनापासून अभिनंदन करतो. संसदीय पद्धतीमुळे लोकशाहीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक मताचा अधिकार आपल्या सर्वांना दिला. त्या एक मताच्या माध्यमातून आपण सर्व सन्माननीय सदस्य इथं बसलो आहोत". अध्यक्ष महोदय, मी आपले अभिनंदन करत असताना आपल्याला विनंती करेल की, आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकावला, तसा मी सुद्धा सर्वात युवा आमदार म्हणून या विधिमंडळात बसण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वात युवा विधिमंडळाच्या सदस्याकडे बारीकपणाने लक्ष द्याल, असे रोहित पाटील यांनी म्हटले.
रोहित पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे लक्ष वेधताना भाषणात, तुम्ही एक निष्णात वकील आहात. आम्ही सुद्धा वकिली पूर्ण करतोय, एक नंबरच्या बाकावरील वकीलांकडे, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जसे तुमचे लक्ष असते. तसेच माझ्याकडे ही असू द्या, अशी विनंती केली.
'या सदनाची मान राखणार असताना अनेक मोठी नावे इथं घडली आहेत. ही परंपरा कायम राखली जाईल. यात आपली कारकीर्द देखील उठून दिसते. आपण सदस्य म्हणून चांगले काम केलेले आहे. मात्र, पुढील काळात देखील विरोधी पक्षावर आपले लक्ष असू द्या. सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या मागण्या आपण पूर्ण कराल. आपण आम्हाला देखील न्याय द्याल', असे रोहित पाटील यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.