Eknath Shinde | Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

BJP Core Committee Meeting : भाजपच्या बैठकीत अजितदादांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेवरून घमासान; नेमकं काय घडलं?

Akshay Sabale

BJP Political News : भाजपच्या कोअर कमिटीची गुरूवारी बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेला झालेल्या पराभवाची झाडाझडती भाजप महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी घेतली.

यावेळी भाजपच्या नेत्यांनी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप केल्यानं बैठकीतील वातावरण गरम झालं होतं. तसेच, मित्रपक्षांनी कुठल्या मतदार संघात मदत केली नाही, याच्या तक्रारीचा पाढाच भाजपच्या (Bjp) नेत्यांनी वाचल्याची माहिती मिळत आहे.


भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक गुरूवारी प्रदेश कार्यालयात रात्री उशिरापर्यंत झाली. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्यासह वरिष्ठ नेते चार-पाच तासांहून अधिक काळ चाललेल्या बैठकीस उपस्थित होते.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी कोणत्या मतदार संघात मदत केली नाही? त्यांचे आमदार, नेते कसे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कशी मदत करत होते, याची माहिती भाजपच्या तीन प्रमुख नेत्यांनी बैठकीत दिली. यावेळी दिंडोरी, सातारा, सांगली, पुणे, बुलढाणा मतदारसंघाचे उदाहरण देण्यात आलं.

शिंदे सेनेचे नेते काही मतदार संघात आपल्यासोबत नव्हते, याचं उदाहरण देत पालघर आणि जालन्याचा उल्लेख भाजपच्या नेत्यांनी केल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालला. त्याचा फटका बसल्याचं नेत्यांनी सांगितलं. तसेच, विधानसभेला जागावाटप लवकर करावे, यासाठी मित्रपक्षांना स्पष्ट सूचना कराव्यात. निवडणुकीशी संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीऐवजी प्रदेश भाजपला द्यावेत, असं मतही नेत्यांनी मांडलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT