BMC
BMC sarkarnama
मुंबई

आदित्य ठाकरेंचा प्रस्ताव आणि भाजप नगरसेवकांचा रात्री साडेनऊपर्यंत ठिय्या

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या संकल्पनेतील सहा महत्त्वाच्या चौकांच्या लॅन्डस्केपिंगच्या प्रस्तावावरून आज महापालिकेच्या (BMC) स्थायी समितीत वादंग निर्माण झाले. अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चर्चा करू न देता हा प्रस्ताव मान्य केल्याचा आक्षेप घेत भाजपच्या सदस्यांनी ठिय्या आंदोलन केले. रात्री साडेनऊपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू होते.

आमदार मिहीर कोटेचा यांनी भाजप नगरसेवकांची भेट घेत आंदोलन आजचे आंदोलन मागे घेण्यास सांगितले. उद्यापासून भाजप नगरसेवक मुंबई महापालिकेच्या प्रत्येक सभागृहात भ्रष्टाचारावर प्रश्न विचारणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा नियोजन समितीमार्फत मुंबईतील सहा चौकांचे लॅन्डस्केपिंग करण्यासाठी महापालिकेला निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची ही संकल्पना आहे. या चौकांच्या प्रकल्पाचा १९ कोटी ५१ लाख रुपयांचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलण्याची परवानगी भाजपच्या सदस्यांनी मागितली. मात्र, अध्यक्षांनी परवानगी न देताच हा प्रस्ताव मंजूर केला, असा आक्षेप भाजपने घेतला. त्या विरोधात अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.

सर्वाधिक भाजपवालेच बोलतात
भाजपचे हे आंदोलन सुरू असताना अध्यक्ष जाधव यांनी क यादी जाहीर केली. गेल्या दीड महिन्यात कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक बोलले याची माहिती या यादीत होती. त्यानुसार भाजपचे नगरसेवक जास्तीत जास्त प्रस्तावांवर चर्चेत सहभागी झाले असल्याचा दावा त्यांनी केला. स्थायी समितीचे कामकाज नियमानुसारच चालते, असे ते म्हणाले.

अध्यक्षांसोबत चहा
भाजपचे ठिय्या आंदोलन सुरू असताना तेथे अध्यक्ष जाधवही आले. त्यांनी भाजपच्या सदस्यांना ठिय्या आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. अध्यक्षांसोबत भाजपचे सदस्य चहा प्यायले. यावेळी हसतखेळत कोपरखळ्याही मारल्या गेल्या. मी तुमच्यासाठी बाहेर आलो, आता तरी ठिय्या आंदोलन स्थगित करा, अशी विनंती जाधव यांनी केली. त्यावर मगर ही अशीच पाण्यातून बाहेर येते. तेव्हा खबरदारी घ्यायची असते, अशी कोपरखळी भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी मारली. त्यावर हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT