Vilas Randve joins Shiv Sena Vishwanath Bhoir Sarkarnama
मुंबई

Mahayuti News: CM शिंदेंचा फडणवीसांना धक्का; जिल्हासचिवासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शर्मिला वाळुंज

Dombivli New: विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पक्षांतर सुरु झाले आहे. विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षामध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे.

भाजप शिवसेना शिंदे गट या युतीमधील मित्र पक्षांमध्येच वाद रंगू लागले आहेत. राजकीय पक्षांमध्ये जागावाटप सुरू असताना इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जागा आपल्या पक्षाच्या वाट्याला येऊन आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येकजण धडपडत आहे. मतदारांच्या भेटी घेत ते आपली ताकद दाखवत आहेत.

भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मागील विधानसभेला बंडखोरी करीत निवडणूक लढवली होती. आत्ताही भाजप स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या या हालचाली सुरू आहेत. भाजपने बंडखोरी केली तर आमच्याकडे देखील डोंबिवली, कल्याण पूर्व व मुरबाड विधानसभा मतदारसंघ आहेत, असा सूचक इशारा शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला देण्यात आला.

हा इशारा देतानाच शिंदे गटाने भाजपला कल्याण पश्चिमेत धक्का दिला आहे. भाजपचे कल्याण जिल्हा सचिव विलास रंदवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ असून येथे शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर हे आहेत. या मतदारसंघावर भाजप दावा सांगत असून तेथून माजी आमदार नरेंद्र पवार, वरूण पाटील हे इच्छुक आहेत.

2014 मध्ये भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ही जागा जिंकली होती. 2019 च्या निवडणूकित भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी त्यांचा पराभव करत ही जागा जिंकली होती.

यंदाच्या निवडणुकीत ही जागा भाजपच्या वाट्याला यावी, यासाठी भाजपचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. यामुळे शिवसेना शिंदे गटात चलबिचल सुरू आहे. एकीकडे पक्षातील वरिष्ठ महायुतीमधून निवडणूक लढविणार असल्याचे सांगत असून एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत.

स्थानिक पातळीवर मात्र मित्र पक्षातील पदाधिकारी आपापसात भिडत आहेत. त्यातच कल्याण पश्चिमेला शिवसेना शिंदे गटाने भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे जिल्हा सचिव रंदवे यांनी रविवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला गेला. यावेळी शिवसेना कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांसह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे. कल्याण पश्चिम येथील भाजपचे स्थानिक पदाधिकारी स्वतःला नेते समजू लागले आहेत. वरिष्ठ पातळीवर महायुतीमध्ये जिथे जे उमेदवार आहेत जी जागा ज्या पक्षाकडे आहे त्याच पद्धतीने निवडणुका जागावाटप होणार असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीमध्ये एकमेकांना सहकार्य करीत जागा लढविण्याचे आव्हान केले जात आहे.

कल्याण पश्चिम येथे भाजपचे स्थानिक पदाधिकारी हे पक्षाने तिकीट न दिल्यास अपक्ष म्हणून देखील निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. याची भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेतली पाहिजे. जर कल्याण पश्चिम येथे माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक वरूण पाटील आणि इतर भाजप पदाधिकारी यांनी बंडखोरी केली. तर आमच्याकडे कल्याण पूर्व, डोंबिवली आणि मुरबाड मतदारसंघात बंडखोरी होऊ शकते.

यापूर्वी देखील भाजपने शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने मोठा भाऊ म्हणून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसु नये. शिवसैनिक हे कदापी सहन करणार नाहीत, असे मोरे यांनी सांगितले. येत्या काळात कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT