Shambhuraj Desai Sarkarnama
मुंबई

Shambhuraj Desai : शंभूराज देसाईचा चंद्रकांतदादा, शिवेंद्रराजेंसमोरच निर्वाणीचा इशारा: ‘भाजपचे काही कटू अनुभव आले; पण हतबल...’

Satara Zilla Parishad President Election Issue : शंभूराज देसाई यांनी सातारा प्रकरणावरून इशारा देत महायुतीतील तणाव उघड केला. शिवसेनेची हिंदुत्व भूमिका स्पष्ट करत भाजपसोबतच्या संबंधांवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 23 March : आम्ही हिंदुत्वासाठी उठाव केला होता. भाजप-शिवसेना युती टिकवण्यासाठी त्यावेळी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली होती. आता सातारा प्रकरणावरून काही कटू अनुभव आले. पण, आम्हाला डिवचू नका. वस्तुस्थिती मांडली म्हणजे आम्ही हतबल आहोत, असं अजिबात समजू नका, असा इशारा अनिल परब यांना देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्री चंद्रकांत पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमोरच भाजपलाही थेट विधान परिषदेत सर्व वरिष्ठ मंत्र्यांसमोर इशारा दिला.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी झालेला प्रचंड राड्याचे पडसाद आज विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले. विधान परिषदेत शिवसेना मंत्र्यांना माजी मंत्री अनिल परब यांनी 289 च्या माध्यमातून डिवचले.

अनिल परब म्हणाले, साताऱ्यात मंत्री मार खात असतील तर हे सरकार सर्वसामान्यांचे संरक्षण कसं करणार? असा आमचा सवाल आहे. काही लोकांनी राष्ट्रवादी आम्हाला संपवायला निघाली आहे, त्यामुळे आम्ही सत्तापालट केला, असे सांगत होते. आता राज्यातील मंत्री भाजपचं नाव घ्यायलाही घाबरत आहेत. पोलिस हे एक प्यादं आहे, पोलिस तुम्हाला मारतात आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसता? कुठे गेला तुमचा स्वाभिमान, बंडखोर वृत्ती?

वाईट तर याचं वाटतं की फक्त शिवसेनेनेच नाही तर राष्ट्रवादीनेही मार खाल्ला आहे. आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून टाकतोय आणि तुम्ही भाजपचं नाव घ्यायलाही घाबरताय. मंत्री मार खातात आणि या सभागृहात आपल्याकडे संरक्षण मागत असतील तर हे सभागृह मंत्र्यांनी संरक्षण मागायचं आहे की आमदारांनी? असा सवालही परब यांनी केला.

परब म्हणाले, आमदार पायावर बसून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करतात. अभूतपूर्व परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे त्यामुळे हा विषय २८९ चा होतो. स्वतःला वाघ समजणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाकडून तुटवले जात आहे. हे वाघ आता गेले कुठे, शेपटी घालून बसलेले आहेत. भाजपच्या विरोधात बोलायची, कुणाची हिम्मत होत नाही.

नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अविश्वास ठराव आणा

विशेष बैठकीत उपसभापतींनी एका आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी तालिका अध्यक्षांनी एका आयएएस अधिकाऱ्याला निलंबित केले आणि नंतर त्याचे निलंबन मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आली. तुम्हाला तुमचे अधिकार वापरायचे असतील तर ज्या अधिकाराखाली आपण मार खाल्ला आहे, तेच अधिकार पुन्हा तुम्ही इकडे वापरत आहात. म्हणजे ‘मीस यूज ऑफ पॉवर’ आहे. उपसभापतींवर का अविश्वास ठराव आणू नये. आमचा तसा एक ठराव प्रलंबित आहे. उपसभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणीही यानिमित्ताने अनिल परब यांनी केली.

एकनाथ शिंदेंनाही डिवचलं

परवीससिंग याने कल्याण महापालिकेच्या निवडणुकीत थोडा त्रास दिला म्हणून यांच्या नेत्यांनी भर व्यासपीठावर राजीनामा दिला होता. कुठे गेले ते शौर्य. का फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भाजपसमोर शेपटी घालायची, हे आम्ही सभागृहात कधी बघितलं नव्हतं, असा टोला अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

‘शेजारी बसणाऱ्यांच्या कानाखाली एकदा तरी मारून बघा

आज तर तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडलात तर आम्ही तुम्हाला भगतसिंगांच्या जागी बघू. तुमची काय हिम्मत सत्ता सोडण्याची. राजे मार खातात, साताऱ्यात दोन राजे मार खातात. माझा माईक बंद करण्यात आलेला आहे. माझा आवाज दाबण्यापेक्षा तुमच्या बाजूला बसून तुमचा आवाज दाबतात ना. त्यांच्या कानाखाली एकदा तरी मारून बघा. ही हिम्मत कधीतरी दाखवा, असे आवाहन परब यांनी शिवसेना मंत्र्यांना केले.

ज्यांना संस्कार नाही ते असे बोलतात : सामंत

अनिल परब यांनी मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. आम्ही उठाव केल्यानंतर मुंबईत जेव्हा परत आलो, तेव्हा ते आमचे कोथळे बाहेर काढणार होते. त्यामुळे शेपटी घालण्याच्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही तुमच्याकडे न्याय मागितला आहे, हा राजकीय संस्कार आहे, ज्यांना संस्कार नाही, ते असे बोलतात, असा टोला उदय सामंत यांनी लगावला.

विनाकारण आम्हाला डिवचू नका प्रयत्न : देसाई

उठाव करतानासुद्धा आमच्या विरोधात काय बोललं होतं. त्यांचे मृतदेह येतील, कोथळे काढण्याची भाषा केली गेली. पण आम्ही परत आलो. काय केलं तुम्ही?, असा सवाल अनिल परब यांना करताना शंभूराज देसाई म्हणाले, विनाकारण आम्हाला डिवायचा प्रयत्न करू नका. आम्ही हिंदुत्वादीसाठी तेव्हा भूमिका घेतली होती. भाजप-शिवसेना टिकवण्यासाठी ती भूमिका घेतली होती. आता काही कटू अनुभव आले हे सोडा. पण आम्हाला डिवचू नका. वस्तुस्थिती आम्ही मांडली म्हणजे आम्ही हतबल आहोत, असं अजिबात नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT