मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर आज एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून, भाजपचे नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी यानंतर चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. याचबरोबर राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी शरद पवार यांनीच करावी, असा अजब सल्ला दिला आहे.
पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी या आंदोलनावर बोलताना चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, फ्रान्सच्या राजाला जनतेने भर चौकात शिक्षा दिली होती. त्याचीच थोडीफार पुनरावृत्ती महाराष्ट्रमध्ये होताना दिसत आहे. या राज्यात माझीच सुरक्षा नाही तर सर्वसामान्य जनतेचं काय, असं शरद पवार यांनी जाहीर करावे. त्यांनीच राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी.
बोंडे आधीपासून वादात
दरम्यान, बोंडे यांना नुकतीच न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. वरुडचे नायब तहसिलदार नंदकिशोर काळे यांना बोंडेंनी कार्यालयात जाऊन शिवीगाळ केली होती. त्यावेळी त्यांना मारहाणही करण्यात आली होती. ही घटना 2017 मध्ये घडली होती. आमदार असताना बोंडे नागरिकांच्या प्रश्नावर आक्रमक झाले होते. यातूनच त्यांनी नायब तहसिलदारांना मारहाण केली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाने बोंडेंना शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्यांना तीन महिने कारवास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
जयंत पाटील यांच्याकडून निषेध
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत निषेध केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते. महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या पवार साहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे, हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते जे कोणी लोक असतील, त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.