Ajit Pawar, Devendra Fadnavis

 

Sarkarnama

मुंबई

निलंबनाबाबत अजितदादा ओघात बोलून गेले अन् फडणवीसांनी संधी साधली...

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा मंगळवारी अखेरचा दिवस आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधिमंडळातील सदस्यांच्या वर्तनाबाबत मंगळवारी विधासभेत चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळ अधिवेशन (Assembly Winter Session) आणि मंत्रालयात बेजबाबदारणे वागणाऱ्या मंत्री, आमदारांना चांगलेच फटकारले. यावेळी पवारांनी वर्तन चांगले नसणाऱ्या सदस्यांना कोणती शिक्षा करावी, याबाबतही अध्यक्षांना विनंती केली. यावेळी बोलण्याच्या ओघात पवारांनी नकळतपणे भाजपच्या (BJP) बारा आमदारांचा मुद्दाही मांडला.

पद-खुर्चीचा मान-सन्मान न ठेवणाऱ्या आमदारांवर पवार संतापल्याने सभागृहातही शांतता राहिली. विधिमंडळ अधिवेशन आणि आवारात आमदारांसाठी तयार केलेल्या शिस्तीच्या नियमांवर पवार बोलायला उभे राहिले आणि क्षणात आमदारांच्या वागण्यांवरून संतापले. असे वर्तन असलेल्या सदस्यांना शिक्षा करायला हवी, असे सांगत पवार म्हणाले, त्यांना चार तास सभागृहाबाहेर ठेवा. त्यानंतर तरी कळेल आपली चूक झाली, हे कळेल.

चार तास कमी वाटले तर एक दिवस करा. पण एकदम बारा-बारा महिने कुणाला पाठवू नका, असं पवार म्हणाले. आमदार झाले म्हणजे सगळं समजतं असं नाही. आम्हालाही अजून समजलं नाही, यांना कधी समजणार, असा टोलाही पवारांनी लगावला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही पवारांचे समर्थन केले. पण त्यांनी नेमकं बारा-बारा महिने कुणाला पाठवू नका, या पवारांच्या बोलण्यावर बोट ठेवलं.

फडणवीस म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांना किमान याची जाणीव असल्याचे समाधान वाटले. बारा-बारा महिन्यांसाठी आमदारांचं सदस्यत्व निलंबित करणे चुकीचे आहे. असं करून आपण विधिमंडळामध्ये न्यायालयीन हस्तक्षेपाची संधी देत आहोत. आपण जर आपण केलेलेच नियम पाळले तर न्यायव्यवस्था कधीच येणार नाही. एखादी घटना घडली तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण ती शिक्षाही प्रत्येक गोष्टीला फाशी देता येत नाही.

खून केला तरी फाशी, पाकिटमारीसाठीही फाशी आणि शिवीसाठीही फाशी, असं करता येत नाही. त्यामुळे याहीबाबत जागृत असलं पाहिजे, असं सांगत फडणवीस यांनी बारा आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित केला. शिक्षेची तरतूद राजकीय वरचढ करण्यासाठी नाही. सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे, यासाठी ही शिक्षा आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांचीही सामूहिक जबाबदारी आहे. आपल्या पक्षाच्या सदस्यांच्या वतर्नाची काळजी घ्यायला हवी. आवश्यकता असेल तर वर्तन चांगले नाही, याबाबत संबंधितांना सांगायला हव, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT