मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा मुद्दा विधानसभेतही गाजला. पण त्यावरून भाजपचे नेते आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली. धमकी देणाऱ्याला कर्नाटकमध्ये अटक करण्यात आल्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांनी (Nawab Malik) थेट भाजपकडे बोट दाखवले. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही हा मुद्दा उचलून धरत थेट सनातन संस्थेवर बंदीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भुजबळांची फिरकी घेतली.
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी थेट नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत कर्नाटक कनेक्शन जोडले. तिथे भाजपचे (BJP) सरकार असल्याचे सांगत त्यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर नवाब मलिकांनी सुशांतसिंह राजपुत (Sushant Singh Rajput) प्रकरणावरून भाजपवर टीका केली. त्यांनी सनातन संस्थेकडे बोट ठेवत धमक्यांबाबत प्रश्न उपस्थित केला.
फडणवीस यांनीही हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत चौकशीची मागणी केली. पण त्यांनी या प्रकाराला राजकीय वळण दिल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. तुम्ही याचे गांभीर्य संपवले. प्रत्येक प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये. महाराष्ट्रात दोन वर्षापासून तुमचं सरकार आहे. तुम्ही सनातनवर कारवाई का केली नाही. आदित्य ठाकरे यांना धमकी आली असेल तर गंभीर आहे. याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
छगन भुजबळ यांनी मलिकांच्या म्हणणे उचलून धरत सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली. केंद्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेत बंदीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी भुजबळांनी केली. त्यावर फडणवीसांनी भुजबळांची फिरकी घेतली. भुजबळ हे वकील असते तर सर्वोच्च न्यायालयात हरीश साळवेंनंतर त्यांचाच नंबर लागला असता, असं फडणवीस म्हणाले. 2012 मध्ये तुमचं सरकार असताना सनातनवर बंदीचा प्रस्ताव आला. पण प्रस्ताव पाठवू शकले नाही, कारण पुरावे नव्हते. पुरावे असतील तर पाठवा. आजही तुम्ही पाठवू शकणार नाही. कोणत्याही समाजाची संघटना असो, त्यावर कारवाई झाली पाहिजे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
मुनगंटीवार यांनी धमकीच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी आमदारांची समिती स्थापन करण्याची मागणी केली. आदित्य ठाकरे यांना धमकी हे आम्हाला चॅलेंज आहे. महाराष्ट्राच्या भूमीला हे चॅलेंज आहे. आमदारांची समिती गठित करावी, असे मुनगंटीवार म्हणाले. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी धमक्यांच्या तक्रारींची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.