Kishori Pednekar, Yashwant Jadhav
Kishori Pednekar, Yashwant Jadhav Sarkarnama
मुंबई

पेडणेकर अन् यशवंत जाधवांपासून मुंबईकरांची मुक्तता होणार!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याकडून सातत्याने महाविकास आघाडीतील (MahaVikas Aghadi) नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. मागील काही दिवसांमध्ये त्यांच्या रडारवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आले आहेत. त्यातच सोमवारी मुंबई महापालिकेची मुदत संपत असल्याने प्रशासकाच्या हाती कामकाज जाणार आहे. त्यावरून सोमय्या यांनी मुंबईकरांची मुक्तता होणार असल्याचा टोला लगावला आहे.

किरीट सोमय्या यांनी सोमवारी याबाबतचे ट्विट केले आहे. गरिब झोपडपट्टीवासियांचे SRA चे गाळे ढापणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर व नाले सफाई कॉन्ट्राक्टरशी संगनमत करून शेकडो कोटीचे घोटाळे करणारे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव पासून आज मुंबई करांची मुक्तता होणार, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबतचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.

पेडणेकरांविरोधात जनहित याचिका

किशोरी पेडणेकर यांनी स्वत: झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थी नसतानाही एसआरए प्रकल्पाच्या इमारतीत अनेक सदनिका बेकायदेशीररीत्या घेतल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच या निवासी सदनिकांमध्ये त्यांच्या पत्त्यांवर आठ कंपन्या स्थापन केल्या असून त्यांना मुंबई महापालिकेची कंत्राटेही मिळवून दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. याविरोधात त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

यशवंत जाधव यांची चौकशी सुरू

सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. काळा पैसा मनी लॉंड्रिंगच्या बेकायदेशीर मार्गाने पांढरा करून घेण्यात यशवंत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही मागे टाकले आहे. त्यांच्या परिवाराचा घोटाळा आता चारशे कोटीच्या घरात गेला आहे, असा आरोप सोमय्या यांनी शनिवारी (ता.५) केला होता. उदय महावार या हवाला ऑपरेटरमार्फत जाधव यांनी कोट्यवधीचा काळा पैसा पांढरा केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

आयकर विभागाने जाधव परिवाराचे चारशे कोटींहून अधिक व्यवहाराचे घोटाळे बाहेर काढले असून आता कंपनी व्यवहार मंत्रालयाने आपली कारवाई सुरु केली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली होती. जाधवांच्या जोडीने भुजबळ आणि गांधी परिवारावर त्यांनी पुन्हा मनी लॉंड्रिंगचा आरोप केला. जाधव यांचे काळ्याचा पांढरा पैसा केलेल्या महावार यानेच गांधी परिवाराच्या नॅशनल हेरॉल्ड कंपनीला अशी मदत केली होती, असे ते म्हणाले. जाधवांनी एक रुपयांचा शेअर पाचशेला विकून कमाल केली असल्याचे त्यांनी सांगितले. जाधव परिवाराचा काळा पैसा पांढरा करण्यात एक आयएएस अधिकारी गुंतला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT