Kirit Somaiya sarkarnama
मुंबई

सरनाईकांची आमदारकी जाणार? सोमय्यांनी टाकले मोठे पाऊल

सरनाईक यांना छाबय्या विहंग गार्डन या इमारतीत केलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत असताना दंड करण्यात आला होता.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांना अनधिकृत बांधकामाबद्दल केलेला दंड व दंडावरील व्याज माफ करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर भाजप (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी टीका केली आहे. या प्रकरणा संदर्भात राज्याच्या लोकायुक्तांकडे अपील करण्यात आले असून पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

भाजपच्या प्रदेश कार्यालयात सोमय्या पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सोमय्या यांनी सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीतील अनधिकृत बांधकामाबद्दल लावलेला दंड व दंडावरील व्याज पूर्णपणे माफ करण्यासंदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीतील टिप्पणीच्या प्रती सादर केल्या. प्रताप सरनाईक यांना छाबय्या विहंग गार्डन या इमारतीत केलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत असताना दंड करण्यात आला होता, असेही सोमय्या यांनी सांगितले.

हा दंड माफ करावा यासाठी सरनाईक यांनी राज्य सरकारकडे अर्ज दाखल केला होता. सरनाईक यांना दंड व त्यावरील व्याज माफ करण्यास अर्थ खात्याने विरोध दर्शविला होता. नगरविकास खात्यानेही सरनाईक यांचा दंड माफ करण्यास विरोध केला होता, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ४ जानेवारीला या संदर्भात लोकायुक्तांपुढे झालेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने सरनाईक यांना केलेला दंड व त्यावरील व्याज माफ करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, अर्थ विभागाचा विरोध डावलून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दंड माफ करण्यात आला. सरनाईक यांना करण्यात आलेला दंड व त्यावरील चक्रवाढ व्याज धरून ही रक्कम १८ कोटी इतकी होते, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

मुख्यमंत्री राज्यातील जनतेची फसवणूक करत आहेत. 2012 मध्ये प्रताप सरनाईक यांचे बांधकाम तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते. 6 महिन्याच्या आत पैसे भरायचे होते असे नोट्समध्ये म्हटले होते. 18 कोटी 10 लाख प्रताप सरनाईक यांना भरावे लागणार. मंत्रिमंडळाच्या नोटमध्ये म्हटले होते की, व्याजासह पैसे भरावे लागणार. ठाकरे सरकारने हिरानंदानी बिल्डरचे पण 40 कोटी माफ केले काय, असा सवाल त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नजीम मुल्ला यांनी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण त्यावेळी बाहेर आले होते. पण आता 'तेरी भी चूप मेरी भी चूप सुरू आहे. ठाणे महानगर पालिकेने आम्ही नोटीस देणार असे कबूल केले होते. त्यांनी पैसे भरले नाहीत तर संपत्ती जप्त करून रक्कम वसूल करावी असे, म्हटले होते. एकदा नोटीस निघाली तर फौजदारी कारवाई करावी लागणार त्यामुळे प्रताप सरनाईक यांची आमदारकी रद्द होणार, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT