मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शनिवारी (२३ एप्रिल) रोजी दुसऱ्यांदा हल्ला झाला. यानंतर सीआयएसएफने या हल्लाची गंभीर दखल घेतली असून यापुढे असा हल्ला झाल्यास हल्लेखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सीआयएसएफच्या कमांडो विभागाने या हल्ल्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज मागितले असून सीआयएसएफच्या कमांडर यांनी याबाबत मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे.
मात्र या सर्व चर्चांवर आता राज्याच्या गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, सीआयएसएफला शूट अॅट साईट असे आदेश असू शकत नाहीत. असे आदेश कोणालाही नसतात. महाराष्ट्र पोलीस असो किंवा सीआयएसएफ असो. मात्र असे काही आदेश किंवा अशी माहिती असेल तर तपासून घेऊ, असेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले आहे.
किरीट सोमय्यांचेही मौन :
अद्याप अशा प्रकारचा अधिकृत आदेश समोर आलेला नाही.त्यामुळे याबाबत किरीट सोमय्यांनाच विचारले असता ते थेट बोलत नाहीत. हल्ल्याची गृह विभागाने गंभीर दखल घेतल्याचेच ते सांगतात. पण शूट अॅट साईटचे आदेश दिले किंवा नाही, याबाबत मात्र त्यांचे मौन आहे. याबाबत 'साम'शी बोलताना सोमय्या यांनी 'उद्धव ठाकरे, सीआयएसएफ आणि गृहमंत्रालयाला माहीत!' एवढंच सांगितलं.
दरम्यान, या असे काही आदेश असल्यास त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी सीआयएसएफच्या जवानांवर असा हल्ला रोखण्याची प्राथमिक जबाबदारी असते. सुरुवातीच्या टप्प्यात हल्लेखोरांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागतो, अशी कायद्यात तरतुद आहे. सुरक्षा दलांना थेट गोळ्या घालण्याच्या आदेशाची अमंलबजावणी अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ घटनेमध्ये करता येते, असे सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी (२३ एप्रिल) दुसऱ्यांदा हल्ला झाला. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक झाल्यानंतर त्यांना भेटायला गेले असता खास पोलिस स्टेशनजवळ किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटली असून त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली आहे. दरम्यान हल्ल्यानंतर बोलताना हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.
सोमय्या यांच्यावर यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या आवारात देखील हल्ला झाला होता. फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणासाठी सोमय्या पुणे महापालिकेत गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर पहिल्यांदा हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. हा हल्ला देखील शिवसैनिकांनीच केल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. दरम्यान दोन वेळा झालेल्या या हल्ल्यांनंतर CISF वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.