Narendra Mehta sarkarnama
मुंबई

भाजपचे माजी आमदार मेहता अडचणीत; जमिनीच्या वादात गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

भाईंदर : भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी मिरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जमिनीच्या मूळ मालकांनी मिरा रोड पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी मिरा रोड येथील एका जमिनीच्या वादात मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (BJP leader Narendra Mehta file case)

भाईंदर पूर्व येथील नवघर गावात राहाणाऱ्या ज्योत्स्ना पावसकर यांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांची वडिलोपार्जित जमीन विकत घेण्याच्या बदल्यात नरेंद्र मेहता यांनी नक्की करण्यात आलेली रक्कम न देणे, तसेच पावसकर यांच्या बहिणीचा हिस्सा विकत न घेण्याचे ठरले असतानाही तिचा हिस्सा विकत घेणे आणि व्यवहार पूर्ण झालेला नसताना सदरची जमीन परस्पर दुसऱ्याला विकणे, यामुळे फसवणूक झाली असल्याचे पावसकर यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

शिवाय जमीन मिरा भाईंदर महापालिकेला हस्तांतर करून मिळालेला टीडीआर अन्य लोकांना विकल्याचा या व्यवहारा संबंधीच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने सह्या घेतल्याचे आणि या व्यवहारासंबंधी महसूल विभागाने बजावलेल्या नोटिशी जमीनमालकांना न बजावता त्यावर बनावट आणि मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या सह्या करून त्या आम्हाला बजावण्यात आल्याचे दाखवण्यात आले असल्याचेही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून मिरा रोड पोलिसांनी नरेंद्र मेहता, लल्लन तिवारी, राहुल तिवारी, विनोद मेहता यांच्यासह एकंदर दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

‘राजकीय फायद्यासाठी तक्रार’

या प्रकरणी मेहता यांच्याशी संपर्क केला असता जमिनीच्या मूळ मालकांनी या जमिनीची आणखी अनेकांना विक्री केली होती. शिवाय मूळ व्यवहार सुमारे पंधरा वर्षांपूर्वी झाला असताना या दरम्यानच्या काळात मूळ मालकांनी कोणत्याही प्रकारची तक्रार दिलेली नाही. मूळ मालकांनी न्यायालयात दाखल केलेला दावाही न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे ही तक्रार राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याची प्रतिक्रिया नरेंद्र मेहता यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT