Pravin Darekar Latest Marathi News, Pravin Darekar News Sarkarnama
मुंबई

दरेकरांच्या संपत्तीत दुपटीने वाढ; 'मजूर' वादानंतर उमेदवारी अर्जात व्यावसायिक म्हणून नोंद

मुंबई मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दरेकरांनी मजूर गटातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावरून मोठा वादा निर्माण झाला होता.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मजूर म्हणून नोंद करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या संपत्तीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अर्जात त्यांनी आपण व्यावसायिक असल्याचे नमूद केले आहे. दरेकर हे जवळपास साडे सात कोटी संपत्तीचे मालक असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. (BJP Pravin Darekar Latest News)

दरेकर यांनी विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीची माहिती दिली आहे. मागील निवडणुकीवेळी दरेकर यांनी सुमारे चार कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. त्यामध्ये 1 कोटी 81 लाख रुपयांची जंगम आणि 2 कोटी 29 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता होती. आता ही संपत्ती 7 कोटी 46 लाखांवर पोहचली आहे.

दरेकर यांच्याकडे सुमारे सव्वा कोटींची जंगम मालमत्ता असून त्यामध्ये 425 ग्रॅम सोने, बँका, वित्तीय संस्थांमधील ठेवी आदींचा समावेश आहे. त्यांची स्थावर मालमत्ता दोन कोटी 30 लाख तर पत्नीची 4 कोटी 18 लाखांची आहे. त्यामध्ये व्यावसायिक गाळे, घरांचा समावेश आहे. आपल्याकडे 29 लाख कुपयांचे कर्ज करण्याचेही दरेकरांनी नमूद केले आहे.

प्रसाद लाड सर्वात श्रीमंत उमेदवार

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांच्या संपत्तीत सहा वर्षांत सुमारे 58 कोटींनी घट झाली आहे. पण तरीही ते सध्याच्या उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये 152 कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. मागील निवडणुकीवेळी त्यांनी 210 कोटींची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. (BJP Prasad Lad Latest Marathi News)

प्रसाद लाड यांची जंगम मालमत्ता 32 कोटी 59 लाख तर पत्नीची 54 कोटी 65 लाख आणि हिंदू अविभक्त कुटुंबाची 74 लाखांची संपत्ती आहे. त्यामध्ये दोन हजार 24 ग्रॅम सोने, हिरे, चांदी, 12 महागड्या घडाळ्यांचाही समावेश आहे. लाड कुटुंबाची स्थावर मालमता 64 कोटी 46 लाखांची आहे. त्यामध्ये प्रसाद लाड यांच्या नावावरील मालमत्ता 30 कोटी 91 लाखांची आहे.

लाड यांच्या पत्नीच्या नावे 29 कोटी 15 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. घरे, व्यापारी गाळे व जमिनींचा त्यामध्ये समावेश आहे. लाड कुटुंबाची 78 कोटी 36 लाख रुपयांची देणी आहेत. लाड हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेसह क्रिस्टल कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या पत्नी नीता या आठ कंपन्यांमध्ये संचालक आहेत. इतर उमेदवार प्रसाद लाड यांच्या संपत्तीच्या जवळपासही नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT