Pravin Darekar
Pravin Darekar  Sarkarnama
मुंबई

तीन तासांच्या चौकशीनंतर दरेकर बाहेर आले अन् म्हणाले, मला भंडावून सोडलं!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे अडचणीत आले आहेत. मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात दरेकरांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यानुसार आज दरेकरांनी रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यानंतर त्यांची तीन कसून चौकशी झाली. चौकशी झाल्यानंतर बाहेर पडलेल्या दरेकरांनी पोलिसांवर दबाव असल्याचा गंभीर आरोप केला. (Pravin Darekar News)

दरेकरांना मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी नोटीस बजावली होती. दरेकरांना आज पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दरेकर आज रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले. यानंतर पोलीस ठाण्याबाहेर भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने आले होते. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी सुरू केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरेकरांची तीन कसून चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. चौकशी झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर दरेकर यांच्यासोबत आमदार प्रसाद लाड आणि नितेश राणे उपस्थित होते.

चौकशीनंतर दरेकर म्हणाले की, जो गुन्हा झालेला आहे त्या प्रतिज्ञा संस्थेच्या सभासदत्वासंदर्भात आणि सभासद म्हणून काय लाभ घेतला, बँकेकडून काही लाभ घेतला का, या अनुषंगाने अनेक प्रश्न विचारण्यात आले. पहिल्यापासून मी जबाब नोंदवण्यास तयार होतो. आमची भूमिका पोलिसांसमोर मांडण्यासाठी आलो. सगळी माहिती पोलिसांना दिली आहे. तेचतेच प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. ज्यांची नियत साफ आहे त्यांना अशा गोष्टींचा त्रास होत नाही. जे जे विचारले त्याची तपशीलवार उत्तरे दिली आहेत. बरेचसे नियमबाह्य प्रश्न विचारले. एका संस्थेपुरता गुन्हा असतानाही इतरही प्रश्न विचारले. तपासातील माहितीच मी दिली आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त स्वत: या चौकशीवर देखरेख ठेवून होते. पोलीस अधिकाऱ्यांवर त्यांचा दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. अधिकाऱ्यांनी माझ्याकडून सखोल माहिती घेतली. सहा-सात वेळा पोलीस अधिकाऱ्यांना फोन आले. ते फोन नेमके कुणाचे होते माहिती नाही. सरकारचा प्रचंड दबाव पोलिसांवर आहे. माझा फोन काढून घेतला नव्हता. चार्जिंग संपल्याने तो चार्जिंगसाठी लावला होता. पुन्हा बोलावल्यासही मी चौकशीला हजर राहीन, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. याला आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने याची चौकशी करुन दरेकरांना अपात्र ठरवले होते. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचे सहकार विभागाने म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT