पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे राज्यसभेवर जाऊन राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त होत होती. राज्यसभेत (Rajya Sabha) जाण्याबाबत खुद्द नितीश यांनीच संकेत दिल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. परंतु, आता त्यांनी यावर खुलासा केला आहे. असे काही बोलल्याचा त्यांनी इन्कार केला आहे. प्रसारमाध्यमे काहीही छापत असतात, असे म्हणत त्यांनी माध्यमांवर खापर फोडले आहे. (Nitish Kumar News)
विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) कमी जागा मिळवूनही भाजपच्या (BJP) मदतीने नितीशकुमार मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून संयुक्त जनला दल (JDU) आणि भाजपमध्ये बेबनाव आहे. मागील काही दिवसांपासून सरकारमधील हे दोन्ही घटक पक्ष एकमेकांना लक्ष्य करीत आहेत. यातच नितीशकुमार यांनी राज्यसभेचा बॉम्ब टाकला होता. यावरून मोठा गदारोळ सुरू झाला. यावर मौन धारण केलेल्या नितीशकुमारांनी आज अखेर खुलासा केला आहे. ते म्हणाले की, प्रसारमाध्यमे काही बातम्या देतात. कधी कधी त्या वाचून मीसुद्धा हैराण होतो. मी राज्यसभेवर जाणार नाही. मी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोललो होतो. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उमेदवारच विजयी होतील. आमचे विधान परिषदेतील संख्याबळ वाढेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.
नितीशकुमार यांनी मागील आठवड्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यसभेवर जाण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली होती. नितीशकुमार हे लोकसभेचे खासदार आणि विधान परिषदेचे सदस्यही होते. सध्या ते विधानसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे आता केवळ राज्यसभेचे सदस्यपद त्यांना मिळालेले नाही. याच पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी एका टप्प्यावर राज्यसभेचे सदस्य व्हायचे आहे, असे म्हटले होते. पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण आले होते.
बिहारमध्ये 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाने भाजपसोबत आघाडी केली होती. पण या निवडणुकीत त्यांना भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या. पण निवडणुकीआधी नितीशकुमार यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे करण्यात आला होता. त्यामुळे भाजपने शब्द पाळत त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली. पण मागील काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये वाद झडत असल्याचे प्रसंग अनेकदा घडले आहेत. यामुळे सरकार किती दिवस टिकणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.