Ashish  Shelar
Ashish Shelar Sarkarnama
मुंबई

यातनांचा कडेलोट झालाय...आता बदल हवाच : नवी जबाबदारी मिळताच शेलार गरजले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबई महापालिकेची (BMC) आगामी निवडणूक शिवसेना (ShivSena) आणि भाजपसाठी (BJP) प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्यांनी मुंबईमध्ये पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी 25 विविध समित्यांची स्थापना केली आहे. त्यामध्ये निवडणूक संचालन समितीच्या अध्यक्षपदी आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरुन शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शेलार यांनी समित्यांची यादी ट्वीटवरुन प्रसिद्ध केली. त्यामध्ये शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शेलार म्हणाले ''गेली 25 वर्षे मुंबईकर भोगत असलेल्या यातनांचा आता कडेलोट झालाय.. बदल व्हायलाच हवा... लढाई आता सुरु! चला मुंबईकर जिंकण्यासाठी आपण लढू!!'' असे सांगत शिवसेनेवर टीका केली आहे.

भाजपने महापालिका निवडणूक समिती यादी जाहीर केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चेनंतर निवडणुकीच्या दृष्टीने 25 समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या मुंबई शहराध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये निवडणूक संचालन समितीच्या अध्यक्षपदी आमदार अॅड. आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माध्यम विभाग समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. निवडणूक संचालन समितीत खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, किरीट सोमय्या हे निमंत्रक असून आमदार राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर, नितेश राणे, प्रकाश मेहता हे सदस्य आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT