Nitesh Rane  Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : अज्ञातवासात असलेले नितेश राणे थेट बँकेत प्रकटले

संतोष परब हल्ला प्रकरणात राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उच्च न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी अडचणीत आल्याने जवळपास अठरा दिवसांपासून अज्ञातवासात असलेले भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) गुरूवारी अचानक प्रकटले. राणे यांनी थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sidhudurg District Bank) गाठत नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसोबत विजयाचे सेलिब्रेशन केलं. दरम्यान, राणे यांच्या अटकपूर्व जामीनावर सोमवारी (ता. 17) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) निकाल दिला जाणार आहे.

सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणात नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत. त्यातच सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल सोमवारी लागणार आहे. पण या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने त्यांना अटक न करण्याची हमी दिली आहे. पण त्यानंतरही राणे जवळपास 18 दिवसांपासून समोर आले नव्हते.

काही दिवसांपूर्वीच भाजपने बँकेत दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला धूर चारली. पण त्यानंतरही नितेश राणे विजयाच्या जल्लोष उघडपणे सहभागी झाले नव्हते. त्यांनी त्यावर ट्विटही केलेलं नाही. त्यामुळे जामीन अर्जावर निकाल लागल्यानंतरच ते समोर येतील, अशी चर्चा होती. पण अखेर गुरूवारी अध्यक्ष व उपाध्यक्षांची नावे घोषित झाल्यानंतर नितेश यांनी थेट बँकेतच हजेरी लावत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. आता अटकपूर्व जामीनावर निर्णय होईपर्यंत ते कार्यकर्त्यांमध्ये सक्रीय राहणार की पुन्हा नॉट रिचेबल होणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.

बँकेत सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. बँकेच्या कार्यालयात नवनियुक्त अध्यक्ष मनीष दळवी (Manish Dalvi) तसेच उपाध्यक्षपद अतुल काळसेकर (Atul Kalsekar) यांना त्यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी एकमेकांना पेढाही भरवला. नितेश राणे अचानक बँकेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील पंधरा दिवसांनंतर ते कार्यकर्त्यांना भेटल्याने कार्यकर्त्यांचाही उत्साह दुणावल्याचे दिसून आले.

दरम्यान, बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी व्हिक्टर डॉन्टस आणि उपाध्यक्षपदासाठी सुशांत नाईक यांनी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अखेर राणेंच्या उमेदवारांनी यात बाजी मारली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 11-7 अशा फरकाने पराभव केला. शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादामुळे जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. राणेंनी जिल्हा बँकेत सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला होता. जिल्हा बँकेत नारायण राणे यांच्या सिद्धीविनायक पॅनेलचे 11 उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीला (MVA) 8 जागा मिळाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT