Raj Thackeray News : भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असं विधान केल्यामुळे पुन्हा एकदा नवीन वाद पेटला आहे. लाड यांच्या अजब वक्तव्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट केला आहे. लाड यांच्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठवण्यात येत असून पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर बॅकफूटला जाण्याची नामुष्की ओढावली आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील लाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे हे सध्या कोकण दोर्यावर आहेत. यावेळी त्यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांच्या जन्माविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर देखील भाष्य केले.
ठाकरे म्हणाले, शिवाजी महाराजांकडून काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं, जे महाराजांनी शिकवलं, त्या गोष्टी शिकायचं नाही. फक्त नको ते वाद निर्माण करत बसायचे. एवढंच सध्या सुरू आहे अशा शब्दांत ठाकरे यांनी लाड यांच्यावर उपरोधिक टोला लगावला आहे. याचवेळी बेरोजगारी, शिक्षण यांसारख्या महत्वाच्या मुद्दयांवरुन लक्ष विचलित करण्यासाठीच नको ते विषय काढले जात आहेत असेही यावेळी ठाकरे म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर आता भाजप आमदार प्रसाद लाड हे देखील वादात सापडले आहेत. लाड यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं विधान केले आहे.
यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेचे अमोल मिटकरी हे देखील आक्रमक झाले असून त्यांनी लाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रवादीकडून लाड यांचा व्हिडीओ ट्वीट...
भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट केला आहे. यात लाड हे संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची सुरुवात कोकणात झाली असे विधान प्रसाद लाड करताना पाहायला मिळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.