ram kadam,Uddhav Thackeray
ram kadam,Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहे का ? भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''भाजपचे सत्तेसाठी हिंदुत्वाचे कातडे पांघरले. आम्ही हिंदुत्व नाही सोडले, सोडणार नाही. भाजपला सोडले भाजप म्हणजे हिंदुत्व सोडले असे नाही,'' अशा शब्दात रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला फटकारलं. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते, आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. राम कदम एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

राम कदम म्हणाले, ''हिंदुत्वावर व्याख्यान देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे की शिवसेना दिवंगत बाळ ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालत आहे का, ज्यांनी म्हटले होते की त्यांचा पक्ष राजकारणात आणि जीवनात कधीही काँग्रेसमध्ये सामील होणार नाही. आणि अशी परिस्थिती उद्भवल्यास ते पक्षाला कार्यालयाला कुलूप ठोकणे पसंत करतील,''

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने रविवारी मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ''शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दिशा दाखवली की हिंदुत्वासाठी आपल्याला सत्ता हवी होती. पण हिंदुत्वासाठी सत्ता की सत्तेसाठी हिंदुत्व, असा सवाल यांना पाहिल्यानंतर पडतो. आज यांचे जे पोकळ हिंदुत्व आहे ते सत्तेसाठी पांघरलेले ढोंग आहे. यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलंय, हे 25 वर्षे यांना पोसल्यानंतर आपल्या लक्षात आले हे आपले दुर्दैव आहे,''

''लोक आपल्यावर टीका करतात की, तुम्ही काय करता आहात. आम्ही हिंदुत्व सोडले असे म्हटले जाते. पण आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही. हिंदुत्व सोडणार नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. त्रिवार नाही,'' असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला ठणकावलं.

''जे काही होईल ते होईल. पण खरं हिंदुत्व काय आहे हे घेऊन आपण पुढे जायचं आहे. हार होईल किंवा जीत होईल, ठीक आहे होऊ द्या. आपण विजयी झालो म्हणून डोक्यात उन्माद जाता कामा नये आणि हारलो तरी पराजयाने खचून जाता कामा नये. आम्ही लढणार. आणि आम्ही बघू बाहेरच्या राज्यांत आम्ही किती दिवस हरू. एक दिवस तोही येईल. जसा भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यात आलेला आहे. तसा आमच्याही आयुष्यात येईल आणि आम्ही तो आणू. एवढी जिद्द आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी दिलेली आहे,'' असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT