Sadabhau Khot, Devendra Fadnavis
Sadabhau Khot, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

अत्यवस्थ वडिलांना दिलेल्या शब्दाला फडणवीस जागले! सदाभाऊंनी सांगितली आठवण

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विधान परिषदेत तोंडभरून कौतुक केलं. याबाबतचा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर टाकला असून फडणवीसांबाबत आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. आपले वडील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असताना फडणवीस यांनी त्यांना दिलेल्या वचनाची आठवणही सदाभाऊ यांनी विधान परिषदेतील भाषणात सांगितली. (Assembly Session)

खोत यांनी गुरूवारी विधान परिषदेत भाषण केलं. ते म्हणाले, वडील लीलावती रुग्णालयात उपचार घेत होते. त्यावेळी मी दुष्काळ दिलासा यात्रा काढली होती. मी पंधरा दिवस यात्रेत होतो. नंतर फलटणला आलो. संध्याकाळी फोन आला लवकर या. मी गेलो त्यावेळी वडील नव्हते. माझे वडील अत्यवस्थ असताना देवेंद्र फडणवीस रुग्णालयात वडिलांना बघायला आले होते. त्यांनी वडिलांचे हात हातात घेत त्यांना सांगितलं, 'मी तुमच्या मुलाला मंत्री करणार आहे,' अशी आठवण खोत यांनी सांगितली. (assembly Session News)

मला मंत्रिपद महत्वाचं नाही. पण त्या माणसानं मला घेतलं आणि मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत राहिलो. माझ्यावर जबाबदाऱ्या टाकल्या. या माणसाचा मला सार्थ अभिमान आहे. या माणसानं आमच्याकडून प्रश्न जाणून घेतले आणि त्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत राहिले. त्यातून जलयुक्त शिवार योजना आली. वाढतं तापमान रोखण्यासाठीचं नियोजन फडणवीस यांनी केलं होतं. त्यासाठी शेतकऱ्यांना बरोबर घ्यावं लागेल, हे या माणसाला कळलं होतं. खेडेगावातील माणून आमदार झाला, मंत्री झाला, त्याचं कारण म्हणजे फडणवीस यांच्यासारखी आशिर्वाद देणारी माणसं आमच्या पाठिशी उभी राहिली, अशी भावनाही सदाभाऊंनी व्यक्त केली.

सदाभाऊ खोत यांची फेसबुक पोस्ट

शब्दाला जागणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. माणसं अनेक पाहिली पण दिलेला शब्द जपणारे, शब्दाला जागणारा नेता म्हणजे आमचे देवेंद्रजी फडणवीस. फडणवीस साहेब ह्यांनी मला आमदार व नंतर मंत्री करून हत्तीचे बळ दिले व शेतकरी-शेतमजूर बारा बलुतेदार यांच्या प्रश्नांवर लढण्याची ताकद दिली. अशा माणसावर मी माझे जीव ओवाळून टाकले तरी ते कमी आहे.

अत्यवस्थ असलेल्या माझ्या वडिलांचे हात आपल्या हातात धरून साश्रू नयनांनी देवेंद्र फडणवीस ह्यांनीच माझ्या वडिलांना मला मंत्री करण्याचं वचन दिलं होतं आणि तो शब्द त्यांनी निभावला. वचन हेच ज्यांचं शासन आहे तो देवमाणुस, लोकनायक म्हणजे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, असं खोत यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यासोबत विधान परिषदेतील भाषणाचा व्हिडीओही आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT