Mandar Borkar sarkarnama
मुंबई

BJP Political News : 'छोटा राजन'चा साथीदार मंदार बोरकर आता भाजपमध्ये

Mandar Borkar Join  BJP : आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत बोरकर यांचा पक्ष प्रवेश

Sudesh Mitkar

Mumbai News : निवडणूक म्हटली की भाजपमध्ये पक्ष प्रवेशाची नांदी सुरू होते. त्याच दृष्टीने आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये 'इनकमिंग' सुरू झाले आहे. पूर्वाश्रमीचा गँगस्टर असलेल्या मंदार बोरकर याच्या नुकत्याच झालेल्या भाजप प्रवेशाने मात्र चर्चांना उधाण आले आहे. 

 एकेकाळी गँगस्टर राहिलेला बोरीवलीतील मंदार बोरकर याने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष,आमदार आशिष शेलार आणि आमदार प्रवीण दरेकर आदी मंडळी उपस्थित होती.  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. मुंबई पालिकेच्या निवडणुका कधीही लागू शकतात. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यताही आहे. या  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंदार बोरकर याचा पक्ष प्रवेश सध्या पश्चिम उपनगरात चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय जनता पार्टीने या माध्यमातून आक्रमक राजकारणाला सुरुवात केल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना उबाठामधील पदाधिकारी नीलेश पराडकर यांना टक्कर देण्यासाठी मंदार बोरकर यांना भाजपमध्ये घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा मुख्य सदस्य राहिलेला आहे. छोटा राजन याला अटक झाल्यानंतरही बोरकर त्याच्या नावावर आपले कारनामे करतच होता. काही महिन्यांपूर्वीच बोरकर एका प्रकरणामध्ये तुरुंगवारी करून बाहेर आला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी काही राजकीय पक्षातील नेत्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. याच प्रयत्नात प्रवीण दरेकर यांच्या संपर्कात येऊन जास्तच जवळचा झाला.अशा वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या बोरकर याला स्वच्छ राजकारणाचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपने प्रवेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने या माध्यमातून ठाकरे गटाच्या जवळ असलेल्या गँगस्टर नरेश (आप्पा) पराडकर याच्या विरोधात जशास तसे उत्तर देण्यासाठी आक्रमक राजकारणाला सुरुवात केल्याची चर्चादेखील सुरू आहे.

शिवसेना (उबाठा ) पक्षाकडे दोन वर्षांपूर्वी गँगस्टर नीलेश (अप्पा) पराडकर याने प्रवेश केला होता. या वेळीदेखील जोरदार चर्चा रंगली होती. पराडकर याला प्रवेश देऊन 'उबाठा'ने आपल्या विरोधातील  विरोधकांना धाकात ठेवण्याची खेळी खेळली होती. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचा पुरेपूर वापर करण्याची रणनीती आखण्यात आली होती. 'उबाठा'ची ही खेळी ओळखून भाजपने बोरकर याला प्रवेश देऊन त्यांना शह द्यायचा प्रयत्न केला आहे. बोरकर याचा महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दणदणीत प्रवेश करून गाजावाजा करण्यात आला आहे. यांचा वापर नेमका कसा केला जाईल आणि याचा फायदा दोन्ही पक्षांना किती होईल हे आगामी काळात समजेलच. मात्र, बोरकर याला पक्षात प्रवेश दिल्याने मुंबईत आगामी निवडणुकीत 'भाजप' साम, दम, दंड, भेद याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

 हा आहे मंदार बोरकरचा परिचय  ?

-बोरीवली येथील केबल ऑपरेटर

-१० पेक्षा अधिक खंडणी आणि जिवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल

-पोलिसांकडून अनेकदा अटक

-छोटा राजन टोळीचा सक्रिय सदस्य  म्हणून ओळख

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT